गोंदियात भाजप उमेदवाराच्या प्रचारात चाबी संघटनेचे वर्चस्व

0
286
गोंदिया – गोंदिया विधानसभा मतदारसंघात अपक्ष आमदार व चाबी संघटनेचे अध्यक्ष विनोद अग्रवाल हे भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक चिन्हावर रिंगणात उतरले आहेत.आमदार अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी भाजपमध्ये मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत घरवापसी केल्याने ते आजच्या घडीला भाजपवासी झालेले आहेत.त्यांच्या प्रचाराच्या नियोजनाकडे बघितल्यास गेली पाच वर्ष जे भाजपचे स्थानिक नेते चाबी संघटनेसोबत लढा देत होते.ते मात्र आजच्या घडीला विनोद अग्रवाल यांच्या घरवापसीनंतर व्दितीय फळीतील नेते झाले असून मोजक्या चार पाच नेत्यांना सोबत घेऊन सद्या प्रचाराची मोहीम राबविली जात असताना भाजपमधील एक वर्ग आजही यातून डावलला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.विनोद अग्रवाल यांच्या वाहनाच्या रंगापासून तर नियोजनपर्यंतच्या गोष्टीकडे बघितल्यास चाबी संघटनेचे वर्चस्व दिसून येत आहे.प्रचाराच्या साहित्य प्रकाशनातील नावापासून तर इतर गोष्टीकंडे बारकाईने नजर फिरवल्यास भाजपच्या पदाधिकार्यांचे नाव असो की नियोजनाची धुरा ही व्दितीय स्थानीच असल्याचे चित्र असल्याने अनेक पदाधिकारी महायुती धर्म व पक्षशिस्तीच्या नावावर गप्प राहून काम करीत असल्याचे बघावायस मिळाले.गोंदिया शहरातील असो की ग्रामीण भागातील अनेक नेते व काही पदाधिकारी मात्र दबक्या आवाजात भाजपवर चाबी संघटनेचे वर्चस्व झाल्याचे बोलू लागल्याने ही खदखद थांबवण्यात भाजप महायुतीचे उमेदवार कितपत यशस्वी होतात,की कानाडोळा करतात याकडे लक्ष लागले आहे.
2019 च्या निवडणुकीच्या आधी भाजप मध्ये मेगा भरती सुरू होती. यात शिवसेनेचे माजी आमदार रमेश कुथे यांनीही आपल्या समर्थकांसह भाजप प्रवेश केला होता. काँग्रेसचे आमदार असलेले गोपालदास अग्रवाल यांनीही आपल्या समर्थकांसह काँग्रेसला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला व 2019 विधानसभेची उमेदवारी मिळविली. त्यामुळे 2014 मध्ये भाजपचे उमेदवार असलेले विनोद अग्रवाल यांनी ‘ मेरा क्या कसूर ‘ म्हणत अपक्ष निवडणूक लढवत विजयश्री खेचून आणली होती. मागील साडे चार वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. शिवसेनेचे माजी आमदार रमेश कुथे यांनीही महिनाभराआधी भाजपला ‘जय महाराष्ट्र ‘ करीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात घरवापसी केली. ८ सप्टेंबर रोजी माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपला राम राम करीत काँग्रेस पक्षात घर वापसी केल्यानंतर विनोद अग्रवाल यांची मनधरणी भाजपने करीत त्यांना पक्षात आणून उमेदवारी तर दिली मात्र आमदार अग्रवालांनी चाबी संगठनेचे अस्तित्तव हे वेगळे असल्याचे स्पष्ट संकेत घरवापसीच्या कार्यक्रमात आधीच दिले होते.त्याचे पडसाद मात्र निवडणूकीच्या प्रचारात मतदारसंघात बघावयास मिळत आहे.