अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी तर ८० कोटी लोक पाच किलो धान्यासाठी रांगेत का-कन्हैयाकुमार

0
223

: महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ गोंदिया येथे सभा

गोंदिया : भारतीय अर्थव्यवस्थ तीन ट्रीलीयनची झाली असून जगात तिसऱ्या स्थानी असल्याचे मोदी सरकार सांगत आहे. अर्थव्यवस्था बळकट होत असेल तर ही खरच आनंदाची बाब आहे. पण हे खरे आहे तर भारतातील ८० कोटी लोक ५ किलो मोफत धान्यासाठी रांगेत का, हा विरोधाभास नेमका कशामुळे आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे नव्हे तर आपल्या जवळच्या मित्रांचे हित साधल्याने असल्याची टिका एनएसयुआयचे अखिल भारतीय प्रभारी कन्हैयाकुमार यांनी केली.

महाविकास आघाडीतील काँग्रेसचे गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या निवडणूक प्रचारार्थ शुक्रवारी (दि.१५) शहरातील भीमनगर मैदानावर आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. कन्हैयाकुमार म्हणाले, संविधानाने तुम्हाला मतदानाचा सर्वात मोठा अधिकार दिला आहे. हा अधिकार झोपडीत व बंगल्यात राहणाऱ्यांना सुध्दा सारखाच असून हीच खरी
संविधानाची ताकद आहे. त्यामुळे तुम्ही केवळ मतदार नाही तर भविष्य घडविणारे आहात. जीवनात एखादी चूक झाली तर ती त्वरित सुधारता येते पण मतदानाच्या वेळी तुम्ही चूक केली तर त्याची शिक्षा ही पाच वर्ष तुम्हाला भोगावी लागते. महाराष्ट्रात होत असलेली निवडणूक ही महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाची आहे. त्यामुळे सजग राहून मतदान करुन महायुती नव्हे महापापी सरकारला धडा शिकवा.

महाराष्ट्रात सत्ता कोणाची हे गुजरातचे व्यापारी ठरवू शकत नाही, ते येथील मतदारच ठरविणार हे भ्रष्ट महायुती सरकारला दाखवून द्या असे आवाहन कन्हैयाकुमार यांनी केले. गोपालदास अग्रवाल म्हणाले, राजकारणात चरित्र खूप महत्वाचे असते आणि आपण ते गेले २७ वर्षांपासून जपत आलो आहे. त्यामुळे दिशाभूल करणाऱ्या बहुरुपींपासून सावध राहून महाविकास आघाडीला साथ देण्याचे आवाहन केले.
ते आमदार नव्हे तर गद्दार
५० खोके घेवून पक्षाशी गद्दारी करणारे ते आमदार नव्हे तर गद्दार होत. त्यांनी केवळ पक्षाशी नव्हे तर संविधान आणि महाराष्ट्राच्या संस्कृती, अस्मीतेशी गद्दारी केली. अशी गद्दारी करुन त्यांनी महाराष्ट्रासारख्या संताच्या भुमीला डाग लावण्याचे काम केल्याची टिका कन्हैयाकुमार यांनी केली.

पक्ष फोडणारे जनतेचे कसे

महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य व संताची भुमी म्हणून ओळखले जाते. पण भाजपने येथे पक्ष फोडून कुटुंबात कलह निर्माण करण्याचे काम केले. खा. शरद पवार, उध्दव ठाकरे यांच्या ह्यातच त्यांच्या पक्षाचे चिन्ह चोरले, कलह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पक्ष फोडून घरात फूट पाडणारे जनतेचे कसे होवू शकतात असा सवालही कन्हैयाकुमार यांनी यावेळी केला.