आमदारकीच्या पाचवर्षाच्या काळात कुठलाच विकास न करणार्यांनाच का दिली संधी

0
610

लोकसभेच्या निवडणूकीत आपल्याच गावात भाजप उमेदवाराला पिछाडीवर ठेवणारे भाजपचे उमेदवार

गोंदिया,दि.१५ः-आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघ हा २००९ ला अनुसूचित जमाती करीता राखीव झाला,तेव्हापासून भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघातून सालेकसा तालुक्याला कधीच विधानसभेत जाण्याकरीता प्रतिनिधीत्व दिले नाही.उलट देवरी तालुक्यातील एकाच कुटूबांतील व्यक्तीला विधानसभा व जिल्हा परिषदेचे पद देऊन इतर तालुक्यावरच नव्हे तर भाजपमधील अनेक निष्ठावतांना डावलण्याचे काम केले.जे मूळचे कधीच भाजपचे नव्हते,ज्यांनी बसपमध्ये राहून भाजपच्या धोरणावर टिका केली,आज तेच भाजपचे तारणहार झाले आणि इतर मात्र त्यांचे चाकर झाल्याची परिस्थिती निर्माण झाल्यानेच सालेकसा तालुक्यातील निष्ठावंत हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांनी बंडखोरी करीत पुराम कुटूबियांच्या मक्तेदारीचा विरोध करण्याचा घेतलेल्या पाऊलांची एकच चर्चा सुरु झाली आहे.त्यातच आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात मतदारसंघात कुठलाही चांगला उद्योग किंवा रोजगाराला चालना देणारा प्रकल्प सोडा दोन गावांना जोडणारा नदीवरील पूल सुध्दा पुर्ण करु शकले नाही.मात्र वेगळ्या कारणाने ते चर्चेत राहिले.

ज्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली,त्यांच्या गावातील त्यांच्याच बुथवर,त्यांच्याच जिल्हा परिषद क्षेत्रात व तालुक्यात लोकसभा निवडणूकीत भाजपच्या उमेदवाराला आघाडी मिळू शकली नाही.जे आपल्या गावात लोकसभेत भाजपला आघाडी देऊ शकत नाहीत,त्यांनाच मात्र पक्ष संधी देत असल्याने त्या अन्यायाच्या विरोधातच शंकर मडावींना थोपाटलेला दंड सालेकसा तालुक्यातील भाजपला पुढच्या काळात न्याय देणारा ठरणार आहे.

२०१४ ते २०१९ या कालावधीत संजय पुराम हे आमगाव-देवरी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी राहिले,त्याच काळात जिल्हा परिषदेतही त्यांच्या पत्नी पदावर राहिल्या.आजही संजय पुराम यांची पत्नी जिल्हा परिषदेत पदावर असताना पुन्हा त्यांनाच विधानसभेची उमेदवारी इतरांना डावलून देणे हा भाजपच्या इतर पदाधिकारी व निष्ठावंतावर अन्यायच असल्याचे सालेकसा तालुक्यातील भाजपच्या अनेक नेत्यांचा सूर निघू लागला आहे.ज्या उमेदवारात बोलण्याकरीता विनम्रता नाही,अभ्यास नाही.जे पाच वर्ष आमदार राहून आदिवासी भाग असलेल्या मतदारसंघाचा विकास करु शकले नाही.औद्योगिक  विकास तर सोडा इतर रस्त्यांचे प्रश्न सोडवू शकले नाही,याउलट संस्कृतीच्या बाहेर जात काम करणारे हे संघविचारसरणीचे कधीपासून झाले असा सवालही आता बंडखोर उमेदवारांच्या सोबतीला असलेल्या अनेकांनी उपस्थित केले आहे.जेव्हा पासून हा मतदारसंघ अस्तित्वात आला,तेव्हापासून भारतीय जनता पक्षाने कधीच या सालेकसा तालुक्याला विधानसभेकरीता महत्व दिले नाही.यावरुन भाजपने या तालुक्याला अडगळीतच टाकले की काय अशी भावना निर्माण होऊ लागली आहे.

या मतदारसंघात २०१४ च्या निवडणूकवेळी भाजपकडे रमेश ताराम सारखा अभ्यासू व विचारधारेचा व्यक्ती असतांना त्यांच्यावर अन्याय करीत भाजपच्या वरिष्ठांनी संंजय पुराम यांना उमेदवारी दिली.तेव्हापासूनच या मतदारसंघात भाजपकडून निष्ठावंत मूळच्या भाजप पदाधिकार्यांवर अन्यायाची झडीच लागली आहे.मागच्या २०१९ च्या निवडणूकीत पराभव होऊनही परत २०२४ ला उमेदवारी द्यायची होती,तर आम्हाला कशाला तुमच्या तालुक्याचा नक्कीच विचार होणार असे सांगत उमेदवारीकरीता अर्ज करायला लावून आमचा पैसा वाया घालवला असा प्रतिप्रश्न भाजपने निलबिंत केलेल्या पदाधिकार्यांनी उपस्थित केला आहे.त्यातच या मतदारसंघातील माजी आमदार केशवराव मानकर,भैरसिंह नागपूरे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर सारख्या जेष्ठांनाही उमेदवारी देतांना विश्वासात घेतले जात नाही,उलट नागपूरच्या व्यक्तींचा हस्तक्षेप वाढल्यानेच स्थानिक भाजपची वाताहत होत असल्याचे बोलले जात आहे.