स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बहुतांश स्वबळावर व मैत्रीपुर्ण लढतीत होणार
गोंदिया, 2 जानेवारी – राज्यातील महायुती सरकारचे सर्वच घटक पक्ष हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत लवकरच भूमिका स्पष्ट करतील,मात्र या निवडणुका स्थानिक पातळीवर होत असल्याने सर्वच पक्षांना आपल्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करावा लागतो असे बोलत मैत्रीपुर्ण व स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले.तर येत्या २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून आपण रिंगणात राहणार असल्याची भुमिका राष्ट्रवादी काँग्रेस(अप)चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केली. ते त्यांच्या रामनगर येथील निवासस्थानी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी आज गुरुवार 2 जानेवारी रोजी संवाद साधताना बोलत होते.
राज्यातील महायुती सरकार शेतकरी, शेतमजुर, सर्व सामान्य जनतेचे सरकार आहे.आम्ही नेहमीच जनतेच्या पाठीशी राहिलो आहेत, महायुती सरकार जाहीरनाम्यातील सर्व वचने पूर्ण करेल अशी ग्वाही देत जिल्ह्याच्या व शहराच्या विकासाकरीता जे लोकप्रतिनिधी निवडून गेले त्यांना जनतेने जाॅब विचारायला हवे असेही म्हणाले.
पटेल पुढे म्हणाले, हे सरकार सर्व आश्वासनांची पूर्तता करेल. नवनव्या योजनांची आखणी करून राज्याला प्रगतीपथावर नेणार, आगामी दोन-चार दिवसांत पालकमंत्र्यांच्या जिल्हानिहाय नियुक्त्या होतील.पालकमंत्री कोण असेल हे ठरवायला मी काही सरकारमध्ये नाही,मात्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीच पालकमंत्र्याची निवड करतील व जिल्हावासीयांच्या उत्कंठेलाही पुर्णविराम लागेल, महायुतीचे सरकार नव्या वर्षात नवे संकल्प करून राज्याला समृद्धीकडे नेईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. येत्या एप्रिलपासून लाडक्या बहिणींना २१०० रुपये, धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20000 रुपये, याशिवाय इतरही आश्वासनांची वाचनपूर्ती करू असे पटेल यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवर मी स्वतः व अजित पवार बोलल्यानंतर इतरांच्या बोलण्याला महत्व नाही
दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर बोलतांना पटेल म्हणाले की पवार कुटुंब एकत्र यावे,ही सर्वांचीच ईच्छा आहे.याकरीता चर्चा होत असेल तर त्यात वाईट काहीच नाही.परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवर मी स्वतः किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार बोलले की त्यानंतर कुणीही बोलला तरी त्यास महत्व नाही असे अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर रोहीत पवार व जितेंद्र आव्हाड यांचा विरोध असल्याचे केलेल्या वक्तव्याचा आधार घेत भूमिका मांडली.