भाजप,काँग्रेसनंतर माजी आमदार कोरेटे शिवसेनेत कुठपर्यंत टिकणार

0
582

गोंंदिया,दि.२१ः-जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील तेलनखेडी गावचे मूळचे असलेले आणि नागपूरमध्ये जमीन व्यवसाय करणारे सहषराम कोरोटे यांनी २०१० मध्ये आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रात ‘जनवादी अधिकार परिषद’ या संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला.२ वर्षात जनवादी अधिकार परिषदेच्या माध्यमातून राजकारणात शिरलेल्या कोरेटेंनी २०१२ मध्ये भाजपमध्ये प्रवेश घेतला.त्यामुळे मूळचे ते काँग्रेसविचारधारेशी नाळ जुडलेले नेते नव्हते हे स्पष्ट झाल्याने त्यांनी काँग्रेस सोडल्याने काही फरक पडणार असे दिसत नाही.कारण स्व.रामरतनबापू राऊत यांच्याशी विश्वासघात करीत त्यांच्या जागेवर आपली उमेदवारी पक्की करणारे काँग्रेसच्या प्रदेशस्तरावरील नेत्यांना पक्षनिष्ठेबाबत सल्ला देणे म्हणजे….काय असा प्रश्न मतदारसंघातील जनतेच्या मनात पडला आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप कडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले. पण भाजपने त्यांना संधी दिली नाही त्यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ‘फळांची टोपली’ चिन्ह घेऊन अपक्ष निवडणूक लढवली.या निवडणूकीत मोठा पराभव झाला. यानंतर २०१५ च्या सुरुवातीला त्यांनी माजी आमदार रामरतन बापू राऊत यांच्यासोबत गोडगुलाबीने जमवत आपले बस्तान काँग्रेसकडे वळवले आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करीत अस्तित्व निर्माण केले. त्यामुळे २०१९ मध्ये काँग्रेसचे तिकीट मिळवून आमगाव-देवरी-६.६ मतदारसंघातून आमदार झाले.मात्र या काळात झालेल्या विधानपरिषद व राज्यसभेच्या निवडणूकीत मात्र काँग्रेस पक्षाच्या यादीत कोरेटे बंडखोर आमदारांच्या यादीत मोजले जाऊ लागले.तेव्हापासूनच कोरेटेना २०२४ ची उमेदवारी मिळणार नाही,हे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी अनपेक्षितपणे स्पष्ट केले होते.व २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना थेट तिकीट नाकारले.त्यानंतरही पक्षाच्या उमेदवाराला मदत करण्याएैवजी भाजपमहायुतीच्या उमेदवाराला मदत करण्याचे काम त्यांनी केल्याने व आमदारकीच्या काळातच ते महायुतीमध्ये प्रवेश करणार अशा अनेकदा चर्चा समोर आल्या होत्या.त्या चर्चावंर आजच्या त्यांच्या एकनाथ शिंंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेशाने शिक्कामोर्तब केले आहे.राज्यात महायुती सरकार आहे,त्यातच कोरेटे हे जमीन व्यवसायिक असल्याने उपराजधानित त्यांचा मोठा व्यवसाय आहे.तो व्यवसाय टिकवून ठेवण्याकरीता विरोधात राहण्यापेक्षा सत्तेतील पक्षात राहणे योग्य राहील हे मनात धरुनच आजचा त्यांचा पक्षप्रवेश असल्याचे बोलले जात आहे. त्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ते किती दिवस व्यवस्थित राहतात याकडेही लक्ष लागले आहे.