
दोन्ही पॅनलला समसमान कौल : सत्तास्थापनेसाठी एका मताची गरज
भंडारा : जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या निवडणुकीचा निकाल शनिवारी सायंकाळी जाहीर झाला. यात शेतकरी विकास पॅनलचे नेते दूध संघाचे विद्यमान अध्यक्ष रामलाल चौधरी यांना पराभूत व्हावे लागले. भंडारा तालुका गटातून त्यांचा अवघ्या दोन मतांना पराभव झाला. शेतकरी पॅनलेचे हितेश सेलोकर यांनी त्यांच्यावर मात केली.
संपूर्ण जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागलेल्या या दूध संघाला मतदारानी दिलेला कौल चकीत करणारा ठरला आहे. कुण्याही एका गटाला बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेसाठी एका संचालकाची गरज आहे.
रामलाल चौधरी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने शेतकरी विकास पॅनल मैदानात उतरवले होते, त्यांना खासदार डॉ. प्रशांत पडोळे आणि आमदार नाना पटोले यांची साथ होती. शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे देखील त्यांच्या गटात सहभागी झाले होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत विलास काटेखाये यांच्या नेतृत्त्वातील सहकार पॅनलला आमदार डॉ. परिणय फुके, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांची साथ होती.
असा आहे निकाल, कुणालाही नाही झुकते माप !
१२ जागांपैकी सहकार विकास आघाडी आणि शेतकरी विकास आघाडीला प्रत्येकी ६ जागांवर समाधान मानावे लागले. यात शेतकरी विकास आघाडीला महिला गटात पराभव पहावा लागला.
सहकार विकास आघाडीच्या अस्मीता शहारे (८६ मते) आणि अनिता तितीरमारे (८२ मते) विजयी झाल्या. अनिता साठवणे यांना ७९ तर, शरयू फेंडर यांना ६८ मते मिळाली.
भटक्या विमुक्त गटातून शेतकरी पॅनलचे आशीष पातरे यांना ८९ तर, सहकारचे पंकज गाजीमवार यांना ७८ मते मिळाली.
अनुसूचित जाती जमाती गटातून शेतकरी पॅनलचे अशीष मेश्राम यांना ८७ तर, सहकारचे अविनाश शेंडे यांना ७९ मते मिळाली.
इतर मागासवर्गीय गटातून शेतकरीचे विवेक पडोळे १०५ मते घेऊन विजयी झाले. शरद इटवले यांना ६१ मते मिळाली.भंडारा तालुका गटातून सहकारचे हितेश सेलोकर २५ मते घेऊन विजयी झाले. रामलाल चौधरी यांना २३ मते मिळाली.
मोहाडी तालुका गटातून शेतकरीचे नरेश पोटेफोडे यांना १५ तर, प्रतिस्पर्धी विलास बांडेबुचे यांना १२ मते मिळाली.
तुमसर तालुका गटातून सहकारचे मुकूंद आगासे यांना ९ तर, लक्ष्मीकांत सेलोकर यांना ४ मते मिळाली.
पवनी तालुका गटातून सहकारचे विलास काटेखाये यांना १६ मते मिळाली. तर, अतूल गभणे यांना ३ मते मिळाली.
लाखनी गटातून शेतकरीचे शरद कोरे ११ मते घेऊन विजयी झाले. सहकारचे चंद्रशेखर टिचकुले यांना ९, अपक्ष विनायक बुरडे यांना ८ मते मिळाली.
साकोली तालुका गटातून सहकारचे मनोहर लंजे यांना १२ तर, सदाशिव वलथरे यांना ५ मते मिळाली.
लाखांदूर तालुका गटातून सहकारचे विलास शेंडे यांना ११ तर, संतोष शिवणकर यांना ४ मते मिळाली