
ठाकरे बंधू एकत्र येणारच
मुंबई::-पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावरुन गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठा वाद सुरु होता. राज्य सरकारच्या या निर्णयावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात ठाकरे बंधूंनी ५ जुलै रोजी मुंबईत मोर्चाचे आयोजन देखील केले होते. तब्बल २० वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र दिसणार होते. मात्र काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषेबाबतचा जीआर रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सर्वांचं अभिनंदन केलं.
तमाम महाराष्ट्राच्या जनतेचं अभिनंदन..विषय रद्द झाला त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांचे अभिनंदन…साहित्यिक, मोजके कलावंत, मराठी पत्रकार, टेलिव्हिजनचे आभार, असं राज ठाकरे म्हणाले. हा विषय क्रेडिटचा नाही. पण विषय निघाला तेव्हा सगळ्यात आधी आम्ही विरोध केला. उद्धव ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने आणि इतरही काही पक्षाने आम्हाला पाठिंबा दिला. त्यामुळे न भूतो न भविष्य असा हा मोर्चा निघाला असता, असं राज ठाकरेंनी सांगितले. खरंतर या गोष्टी करायची काही आवश्यकताच नव्हती. मंत्री दादा भुसे आले तेव्हा मी म्हटलो की, या विषयात काही तडजोड होणारच नाही, असं राज ठाकरेंनी सांगितलं.
हिंदी काही राष्ट्रभाषा नाही जी तुम्ही लादावी, ती एका प्रांताची भाषा आहे. हे मान्य होऊच शकत नाही, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच हिंदी सक्तीबाबतचा निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यानंतर काल मला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा मला फोन आला होता. संजय राऊत म्हणाले, पुढे काय करायचं, विजयी मेळावा करुया असं म्हणाले. मी म्हणालो, मोर्चा तर रद्द करावा लागेल…त्यावर संजय राऊत म्हणाले ५ जुलैला विजयी मेळावा घेऊया, यावर हो चालेल…विजयी मेळावा घेऊया, असं राज ठाकरे संजय राऊतांना म्हणाले. चर्चा करुन विजयी मेळावा घेण्यासंदर्भात बोलू, असं राज ठाकरेंनी संजय राऊतांना कळवलं. आम्ही अद्याप ठिकाण वैगरे निश्चित केलेलं नाही. आम्ही सगळ्यांशी बोलू…माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून मी सांगेन, असं राज ठाकरे म्हणाले. ५ तारखेला विजयी मेळावा होईल, त्या मेळाव्यात ही कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल, अशी माहितीही राज ठाकरेंनी दिली.