
मुंबई:-:-भाजपला लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. यासाठी रविंद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. आता मंगळवारी संध्याकाळी नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होणार आहे.
याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी निवडणूक सुरु झाली आहे. यासाठी केंद्रिय मंत्री किरण रिजिजू आले आहेत. त्यांच्या समोर आम्ही रविंद्र चव्हाण यांचा प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. जे यापूर्वी मंत्री होते, त्यांनी युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली होती, त्यानंतर ते नगरसेवक झाले, नंतर आमदार झाले. आज प्रदेशाध्यक्षरदासाठी आम्ही त्यांचा अर्ज दाखल केला आहे. पुढे बोलताना फडणवीसांनी म्हटले की, ‘मागच्या काळात चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून अतिशय चांगलं काम केलं आहे, त्यांनी चांगल्या प्रकारे संघटना बांधली, याचा परिणाम विधानसभा निवडणूकीत दिसून आली.
त्यानंतर रविंद्र चव्हाण यांची कार्याध्यक्ष म्हणून काम केलं. आज आम्ही त्यांचा अर्ज दाखल केला आहे. उद्या संध्याकाळी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल. रविंद्र चव्हाण हे २००७ मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 2007 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असतानाही भाजप नगरसेवक असूनही स्थायी समितीचे सभापती झाले. 2009 मध्ये तत्कालीन भाजप आमदार हरिश्चंद्र पाटील यांचे तिकीट कापून रविंद्र चव्हाण यांना भाजपने उमेदवारी दिली आणि त्यांनी तो विश्वास खरा करुन दाखवला. ते २००९ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. यानंतर 2014 मध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून त्यांनी शपथ घेतली.
यानंतर 2015-16 मध्ये कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, ठाणे, पनवेल, महापालिकेत भाजपचा बोलबाला पाहायला मिळाला. तसेच कर्जत, माथेरान, बदलापूरमध्ये भाजपने चांगले यश मिळवले. त्यामुळे त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले. तसेच ते रायगड, पालघर पालकमंत्रीही होते. यानतंर 2019 मध्ये तिसऱ्यांदा आमदार झाले. 2021 मध्ये शिंदे भाजप सरकार आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. यानंतर 2021 मध्ये रविंद्र चव्हाणांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्याकडे पीडब्ल्यूडी खाते होते. त्यांनी सिंधूदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही कारभार सांभाळला. यानंतर 2024 मध्ये चौथ्यादा डोंबिवलीतून आमदार झाले. आता त्यांच्या गळ्यात महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडणार आहे.