
नंदुरबार:-विधीमंडळात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत सापडले आहेत. अशातच संकटामध्ये सापडलेल्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनिदेवाच्या चरणी धाव घेतली आहे. राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. देशातील एकमेव शनी देवाचे साडेसाती मुक्त स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनिमंडळ येथील शनी मंदिरात कोकाटे यांनी दर्शन घेऊन पूजाअर्चा केली.
शनिवारी शनि देवाची साडेसाती मुक्ती ठिकाणी पूजा केल्याने मागे लागलेली इडा पिडा दूर होत असल्याची भाविकांची भावना आहे. शेतकऱ्याबाबत केलेलं वक्तव्य किंवा विधीमंडळात रमी खेळतानाचा त्यांचा व्हायरल व्हिडीओ असेल, यामुळे ते विरोधकांच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्यावर आरोपांची राळ उडवली जात आहे, तर त्यांचा राजीनामा घेतला जाण्याची दाट शक्यता देखील वर्तवली जात आहे. कारण मंगळवारी त्या संदर्भात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या सर्व घडामोडी घडत असतानाच आपल्या मागची इडा पिडा टळावी यासाठी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आता शनिदेवाला साकडं घातलं आहे. लवकरच कोकाटेंच्या राजीनाम्याबाबतचं चित्र स्पष्ट होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, तुम्ही चुका करा मी तुमच्या पाठीशी आहे’, असं शनिमहाराज कधीही सांगत नाहीत, तरीही चुका करून अडचणीत सापडल्यानंतरच भल्याभल्यांना शिंगणापूरच्या शनिदेवाची आठवण येते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर केली आहे.





