विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी पाटील यांची निवड

0
5

नागपूर – राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर अखेर राज्याला विरोधीपक्ष नेता मिळाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधीपक्ष नेतेपदी घोषणा करण्यात आली आहे. विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांनी ही घोषणा केली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांनंतर भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. भाजप-शिवसेना यांच्यातील युती तुटल्यामुळे शिवसेना विरोधी पक्षात बसणार की काय? अशी शक्यता सर्व घडामोडींवरून व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपदाबाबत कोणतीही ठाम भमिका घेण्यात येत नव्हती. पण हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यानंतर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीपैकी एका पक्षाच्या नेत्याच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडणार हे निश्चित झाले होते. मात्र तरीही हा निर्णय वाटतो तेवढा सोपा नव्हता. त्याचे कारण म्हणजे विरोधकांचे संख्याबळ हे आहे.
विरोधकांमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसचे 42 आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसता विरोधीपक्ष नेता घोषित करण्याची मागणी येत होती. पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचेही 39 आमदार होते. त्याचबरोबर त्यांना शेतकरी कामगार पक्षाच्या 3 आमदारांनीही पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे त्यांचेही संख्याबळ 42 वर जात असल्याने प्रेचप्रसंग निर्माण झाला होता, असे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले आहेत. मात्र, यासंदर्भात सखोल चर्चा करून तसा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.