शेतकरी हितासाठी स्वामीनाथ आयोगापेक्षाही चांगला निर्णय होणार-खा.नेते

0
20

गोंदिया,दि.24(berartimes.com)-शेतकरी हा जगाचा पालनकर्ता आहे.शेतकर्याने जर अन्नधान्याचे उत्पादन केले नाही तर मानवाची उपजिविका थांबेल तेव्हा ज्या शेतकर्यावर मानवच नव्हे तर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते त्या शेतकरी बांधवाचा सर्वांगीण विकास हाच केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारचा प्रयत्न आहे.शेतकर्याच्या मालाला उत्पादन खर्चानुसार भाव मिळावा,बाजारपेठ मिळावी.सिंचनाची सोय व्हावी आदी गोष्टीसांठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम सुरु असून स्वामीनाथन आयोगापेक्षाही चांगला निर्णय शेतकरी हितासाठी घेण्यावर विचार सुरु असल्याची माहिती गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते यांनी दिली.ते रविवारला गोंदियाच्या विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते.यवतमाळ येथे आपण जे बोललो त्याचा विपर्यास लावला गेल्याचे सांगत एका वृत्तवाहीनीवर एक शेतकरी कर्जमुक्तीबद्दल बोलत असताना त्यानी कसे शब्द वापरले हे सांगितले परंतु ते आपल्या तोंडी लावण्यात आल्याचे सांगत मी स्वत व आमचे सरकार शेतकरी कर्जमुक्तीच्या बाजूने असल्याचे सांगितले.

पक्षाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या खासदार प्रवास योजनेतंर्गत केंद्रसरकार व राज्यसरकार राबवित असलेल्या योजनाची माहिती जनतेपर्यंत पोचावी तसेच पक्षाच्या प्रत्येक सभासदाला ती माहित व्हावी यासाठी पक्षाने ६ ते १४ एप्रीलपर्यंत ही योजना राबविली त्यातंर्गत आपण यवतमाळ व वाशिम जिल्ह्यात गेलो होतो असे सांगितले.सोबतच गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील विकास कामाची माहिती देतांना मतदारसंघात येणार्या आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याचे सांगितले.सध्या दुपदरीकरण असलेला हा राष्ट्रीय महामार्ग ब्रम्हपुरी-वडसा-कुरखडा-कोरची -देवरी-आमगाव -गोंदिया असा आहे.सोबतच आमगाव येथील किडंगीपार व बाम्हणी रेल्वेचौकीवर लवकरच पुलाचे काम मंजुर होऊन सुरु होणार असल्याचे सांगितले.आपल्या मतदारसंघात १२२४६ कोटीची कामे केंद्राकडून मंजूर केली असून यात सात राष्ट्रीय महामार्गाचा समावेश असल्याचे म्हणाले.गडचिरोली वडसा व नागभिड-नागपूर रेल्वेमार्गासाठी सुध्दा निधी उपलब्ध झाला असून नागपूर-नागभिड -वडसा -गडचिरोली व गडचिरोली -वडसा-गोंदिया अशी रेल्वे भविष्यात सुरु होणार असल्याचेही सुतोवाच केले.पत्रपरिषदेला आमगाव भाजप शहर अध्यक्ष घनश्याम अग्रवाल,गडचिरोलीचे संजय बारापात्रे,नगरसेवक नंदुजी काबरा व जावेद अली हे सुध्दा उपस्थित होते.