चंद्रपूरातील जनआक्रोशला नागरिकांचा प्रतिसाद,काँग्रेसमध्ये मात्र दुफळी

0
12

चंद्रपूर,दि.07 : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्त्वात येथील चांदा ्रक्लब ग्राऊंडवर पार पडलेल्या जनआक्रोश मेळाव्याला पूर्व विदर्भातील जनतेची उत्स्फूर्त प्रतिसाद देत सरकारविरोधातील आपला ‘आक्रोश’ दाखवून दिला. राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मेळाव्याला प्रारंभ झाला.
मागील दोन दिवसांपासून जनआक्रोश मेळाव्याच्यानिमित्ताने चंद्रपुरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. मेळाव्याला किती लोक येतील, यावरून साशंकतेचे वातावरण निर्माण झाले होते. आयोजक मात्र मेळावा यशस्वी होण्यासाठी सकारात्मक होते. अखेर मेळाव्याचा दिवस उजळला. चंद्रपूर-नागपूर मार्गावर अनेकांनी नेत्यांचे फलक लावल्याने वातावरण काँग्रेसमय झाले होते. मेळाव्यात कवी मंझर भोपाली यांनी आपल्या कवितांमधून सरकारच्या धोरणांचा विनोदी शैलीत चांगलाच समाचार घेऊन वाहवाही मिळविली असली तरी काँग्रेसमधील दुफळीही चर्चेची राहिली.
काँग्रेसचे उपगटनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्त्वात या जनआक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याला उसळलेली गर्दी पाहुन अनेकांनी आ. वडेट्टीवारांचे तोंडभरुन कौतुक केले. या मेळाव्यात आ. वडेट्टीवारांनी केलेले प्रास्ताविक तडाखेबाज होते. त्यांनी आपल्या जोशपूर्ण भाषणात प्रत्येक मुद्यांना विनोदाची झालर देत हात घातल्याने उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट होत होता. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘विजयभाऊ तुम आगे बढो आप फिकर मत करो’ अशा शब्दात त्यांची पाठ थोपटल्याने त्यांच्या नेतृत्त्वाला नवी झळाळी मिळाली आहे. त्यांनी नेत्यांची भाषणे सुरू असताना जनतेत शांतता दिसताच वा पाण्यासाठी त्यांची होत असलेली तळमळ पाहुन त्यांच्यात उत्साह संचारण्याचे काम करताना ते दिसून आले.भाजप सरकारच्या काळात राज्यात महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे वाढले आहे. भारतात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. २०१६ मध्ये १९ वेळा सिलिंडरचे भाव वाढवल्याने गृहीणींचे बजेट कालमडले आहे. मुख्यमंत्र्यांकडेच गृहखाते आहे, असा आरोप महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस यांनी केला.