प्रसाद लाड यांचा एकतर्फी विजय, काँग्रेस-राष्ट्रवादीची ९ मते फुटली

0
9

मुंबई,दि.8 : काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येत सरकारविरोधात हल्लाबोल करण्याची तयारी चालविली असताना विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत या दोन्ही पक्षांना आपले आमदारही सांभाळता आले नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नऊ मतांवर हल्लाबोल करीत भाजपाचे प्रसाद लाड यांनी एकतर्फी विजय मिळविला. माजी मुख्यमंत्री नारायम राणेंनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी ही पोटनिवडणूक झाली. यात भाजपाचे लाड यांना
२०९ तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप माने यांना केवळ ७३ मते मिळाली. एकूण २८४ मतदान झाले. त्यातील दोन मते अवैध ठरली. विरोधकांकडे काँग्रेस (४२) आणि राष्ट्रवादी (४१) मिळून एकूण ८३ संख्याबळ होते. सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ मतदानाला आले नाहीत. त्यामुळे एक मत आधीच कमी झाले. उर्वरित ८२ पैकी फक्त ७३ मते माने यांना मिळाली. याचाच अर्थ काँग्रेस-राष्ट्रवादीची किमान नऊ मते फुटली.
एमआयएमच्या दोन आमदारांनी मतदानात भाग घेतला नाही. शिवसेनचे नेते, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी न्यायालयाने रद्द केल्याने त्यांना मताधिकार नव्हता.