23.9 C
Gondiā
Saturday, August 29, 2026
Home राजकीय पवारांच्या भेटीसाठी ममता बॅनर्जी राष्ट्रवादी कार्यालयात

पवारांच्या भेटीसाठी ममता बॅनर्जी राष्ट्रवादी कार्यालयात

0
26

नवी दिल्ली,(वृत्तसंस्था): एकीकडे कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना, तिकडे दिल्लीत मात्र भाजपविरोधक एकवटत आहेत. नुकतेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदेतल्या कार्यालयात चर्चा झाली. या भेटीचा तपशील समजू शकलेला नाही. मात्र ममतांची आजची दिल्ली भेट ही 2019 साठी काही नवी समीकरणे घडवणार का, अशी चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे. या भेटीवेळी शरद पवारांसह खासदार प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, धनंजय महाडिक आदी राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.

संजय राऊत ममतांच्या भेटीला
पवार-ममता भेटीच्या काही वेळापूर्वी दिल्लीत आणखी एक चर्चात्मक भेट झाली. ही भेट होती शिवसेना खासदार संजय राऊत आणि ममता बॅनर्जी यांची.ममता बॅनर्जींनी आज दिल्लीत भेटसत्रच घेतले. कारण शरद पवार आणि संजय राऊत यांच्याशिवाय ममतांनी तिसरी भेट घेतली ती म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांची.संजय राऊत आणि राजू शेट्टी हे एकाचवेळी ममतांच्या भेटीला गेले होते.एकंदरीत दिल्लीतील या भेटीगाठीवरुन भाजपविरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आल्याचे दिसते.