अखेर भाजपने आपला बालेकिल्ला सर केला!

0
17

सुरेश भदाडे
देवरी- अखेर अनेक तर्क-वितर्कांना फोल ठरवत भारतीय जनता पक्षाने ६६-आमगाव विधानसभा मतदारसंघ हा आपला परंपरागत बालेकिल्ला सर केला. मोदी लाटेवर स्वार युवा नेते संजय पुराम यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार आणि माजी आमदार रामरतन राऊत यांचा १८ हजार २९५ मतांनी पराभव करीत पार धुव्वा उडविला. उल्लेखनीय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश ताराम यांनी तब्बल ३५ हजार ९१८ मते घेऊन २००५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या पराभवाचा वचपा काढला.
bhajapane-balekilla-sarkela
तेराव्या विधानसभेसाठी गेल्या १५ तारखेला मतदान घेण्यात आले होते. ६६ आमगाव विधानसभेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीची मतमोजणी स्थानिक औद्यागिक प्रशिक्षण केंद्रात पोलिसांच्या चोख बंदोबस्तात पार पडली. सकाळी आठ वाजता सुरू झालेली मतमोजणी ही दुपारी १ वाजेच्या सुमारास पूर्ण झाली. मतमोजणीच्या एकूण २२ फेèया घेण्यात आल्या. यात भाजपचे संजय पुराम यांनी आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे रामरतन राऊत यांना सुरवातीपासून चांगलेच पछाडले होते. मतमोजणीच्या प्रारंभीपासून १० व्या फेरीपर्यंत राष्ट्रवादीचे रमेश ताराम हे दुसèया क्रमांकावर होते. गेल्या वेळी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे रमेश ताराम यांना त्यांच्या गृहतालुक्यातील मतदारांनी नाकारले होते. यावेळी सुद्धा त्यांना तोच अनुभव आला. या मतदारसंघातील २ हजार २८१ मतदारांनी यावेळी नोटाला मत देत एकही उमेदवार आमदार होण्यालायक नसल्याचे आपल्या मतदानातून दाखवून दिले. निवडणूक प्रचारात आघाडी घेणारे भाजपचे फुटीरवादी नेते सहषराम कोरेटी यांना मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली. मराठी अस्मिता जागविण्यात शिवसेनेला येथे अपयश आले. सेनेतील गटबाजीमुळे त्यांचे चांगलेच पानिपत झाले. बसपच्या हत्त्यावर स्वार शारदा उईके या ही फारशी करामत करू शकल्या नाही. दोन अपक्षांना आपली अनामत रक्कम देखील वाचविता आली नाही.
उल्लेखनीय म्हणजे काँग्रेसच्या रामरतन राऊत यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील चुका चांगल्याच भोवल्याचे दिसून येते. २००५ साली आघाडीचा उमेदवार उभा असताना श्री. राऊत यांनी बंडाळी करीत ३५ हजार मते घेत राष्ट्रवादीचे नरेश माहेश्वरी यांच्या पराभवासाठी मोलाची कामगिरी केली होती. परिणामी, या मतदार संघात काँग्रेसला चांगलीच गळती लागली होती. त्या पराभवाचे शल्य राष्ट्रवादीचे नेते अद्यापही विसरले नाही. या निवडणुकीत संधी मिळाल्याने २००५ मध्ये राऊत यांनी मिळविलेल्या मतांएवढीच मते यावेळी रमेश तारामला पुढे करून राष्ट्रवादीने घेतली. यामुळे राऊत यांना पराभवाला सामोरे जावे लागले. शिवाय नोटाला मिळालेली मते हीसुद्धा काँग्रेसच्या नाराज मतदारांची असल्याची चर्चा मतमोजणी केंद्राबाहेर होती.
दरम्यान, भाजपचे विजयी उमेदवार संजय पुराम यांचे निवडणूक निर्णय अधिकारी दुर्वेश सोनवाने यांनी प्रमाणपत्र देत अभिनंदन केले. देवरी पत्रकारसंघाच्या वतीने सर्वप्रथम पुराम यांनी सत्काराचा स्वीकार केला. यानंतर त्यांची देवरी शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली.
उमेदवारांना मिळालेली मते
मूलचंद गावराने (शिवसेना)-९३७४
रमेश ताराम (राष्ट्रवादी)-३५,९१८
संजय पुराम (भाजप)-६२,५९०
रामरतन राऊत (काँग्रेस)- ४४,२९५
शारदा उईके (बसप)- ६,१३४
केशव भोयर (अपक्ष)- १,२२५
सहषराम कोरेटी ( अपक्ष)- १३,४१४
संतोष नाहाके (अपक्ष) -१,१०४