अमर साबळेंना राज्यसभेची लॉटरी, सहस्त्रबुद्धेंना डावलले!

0
16

मुंबई- विधान परिषदेप्रमाणेच राज्यसभेसाठी भाजपने धक्कातंत्राचा वापर करीत अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष अमर साबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. साबळे हे भाजपचे जेष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचे कट्टर समर्थक मानले जायचे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातून त्यांना पक्षाने अर्ज माघारी घ्यायला सांगितला होता. भाजपने हा मतदारसंघ आठवले यांच्या आरपीआय पक्षाला सोडला होता. आज दुपारी 12 वाजता मी भाजपच्या वतीने एकटाच उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे साबळे यांनी सांगितले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेतील खासदार मुरली देवरा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी अर्ज भरण्यासाठी आज दुपारी 3 पर्यंत मुदत आहे. त्यासाठी भाजपकडून पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक विनय सहस्त्रबुद्धे, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस शाम जाजू आणि भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांची नावे चर्चेत होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राज्यसभेसाठी नाव निश्चित करण्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहांची सोमवारी दुपारी दिल्लीत भेट घेतली. दरम्यान, विनय सहस्त्रबुद्धे यांना संधी मिळेल असे बोलले जात होते. मात्र, विधान परिषदेत जसे धक्कातंत्र वापरत नवे नाव पुढे आणले गेले तसेच आताही झाले. प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी विधानपरिषदेप्रमाणेच ऐनवेळी नवे नाव पुढे येईल असे सांगत भाजप नेत्यांना गॅसवर ठेवले होते. अखेर तसेच झाले.
राज्यसभा निवडणुकीसाठी विधानसभा सदस्य मतदान करतात. सध्या महाराष्ट्र विधानसभेत भाजपचे सर्वाधिक 123 आमदार आहेत. त्यामुळे भाजपचा उमेदवार विजयी होईल अशी स्थिती आहे. भाजपखालोखाल शिवसेनेचे 63, काँग्रेसचे 42 तर राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत.