काँग्रेसने केली राणेंच्या उमेदवारीची घोषणा

0
7

मुंबई- काँग्रेसचे नेते नारायण राणेंच्या विरोधात वांद्रे पूर्व या मतदार संघातून उमेदवार रिंगणात उतरविण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्याने वांद्रेतून शिवसेनेला टक्कर देण्यास राणे सज्ज झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राणेंच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविल्यानंतर काँग्रेसने रविवारी संध्याकाळी राणेंना वांद्रे मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली.
राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची परतफेड म्हणून तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार आणि माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांच्याविरुद्ध उमेदवार उभा करण्याचा निर्णय काँग्रेसनेही घेतला आहे.

रविवारी सकाळी नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत वांद्रे पूर्व येथील पोटनिवडणुकीबाबत त्यांच्यात चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. भेटीच्या सुरुवातीलाच पवारांनी पोटनिवडणुकीत उतरण्याबाबत नारायण राणेंनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारने घेतलेल्या काही निर्णयांमुळे सध्या सामान्य जनतेत नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेत निर्माण झालेले काँग्रेस विरोधी वातावरण निवळण्यास सुरुवात झाली असून त्याचा फायदा या निवडणुकीत राणेंना होऊ शकतो असा पवारांचा अंदाज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे फक्त राणेंच्या विरोधात उमेदवार देण्याची निव्वळ औपचारिकता पूर्ण करण्याऐवजी प्रचारातही राष्ट्रवादी काँग्रेसकडून राणेंना मदत मिळण्याचे संकेत पवारांनी या भेटीत दिल्याचे समजते. पवारांच्या या अाश्वासनानंतर राणेंनी या पोटनिवडणुकीत उतरण्याचा निर्धार पक्का केला असून येत्या मंगळवारी ते आपला उमेदवारी अर्जही दाखल करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.