33.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home राजकीय सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ.अण्णासाहेब शिंदे यांच्यामुळे नगरचे नाव देशपातळीवर-सचिन पायलट

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ.अण्णासाहेब शिंदे यांच्यामुळे नगरचे नाव देशपातळीवर-सचिन पायलट

0
49

महाआघाडीचे सरकार ब्रम्हा, विष्णू, महेश यांच्यासारखेः नाना पटोले

संगमनेर,दि.१२:  स्वातंत्र्याप्राप्तीसाठी लढणारे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ.आण्णासाहेब शिंदे यांनी केलेल्या रचनात्मक व दिशादर्शक कार्यामुळेच नगरचे नाव देशपातळीवर गौरवाने घेतले जाते. महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात भाऊसाहेबांचा विकासाचा वारसा पुढे घेऊन जात आहेत. त्यांच्यातील नम्रता, संयम, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे कौशल्य, सर्वांगीण विकासाची दृष्टी नव्या पिढीसाठी अनुकरणीय आहे असे, गौरोवोद्गार राजस्थाने उपमुख्यमंत्री ना.सचिन पायलट यांनी काढले आहेत.
मालपाणी लॉन्स येथे झालेल्या स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष ना. नाना पटोले हे होते तर व्यासपीठावर महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, डॉ.गिरीश गांधी, सत्यशील  शेरकर, आमदार डॉ.सुधीर तांबे, माजी केंद्रियमंत्री विजय नवल पाटील, आ. लहू कानडे, आ. डॉ. किरण लहामटे, आ. हिरामण खोसकर, बाळासाहेब साळुंखे, माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार कल्याणराव काळे, उद्योजक राजेश मालपाणी, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, नामदेवराव पवार, अरुण पा.कडू, माधवराव देशमुख, उद्धव वाघ, करण ससाणे, सचिन गुजर, बाळासाहेब विखे, सौ.कांचनताई थोरात, नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे, सौ.शोभाताई कडू, सौ. शरयुताई देशमुख, इंद्रजितभाऊ थोरात, रणजितसिंह देशमुख, राजवर्धन थोरात, सौ. लताताई डांगे, सौ. योगिता शेरकर, सुरेशराव कोते, बाजीराव पा.खेमनर, संदीप गुळवे, रामदास पा.वाघ, लक्ष्मणराव कुटे, भाऊसाहेब कुटे आदि मान्यवर उपस्थित होते.
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने सहकार, साहित्य, समाजसेवा, पर्यावरण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणा-या व्यक्तींसाठीचा स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना तर कृषी, शिक्षण, संशोधन या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणा-या व्यक्तींना दिला जाणारा डॉ. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार पर्यावरण तज्ञ डॉ. गिरीश गांधी यांना सचिन पायलट व नाना पटोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक लाख रूपये व स्मृती चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर सहकार क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणा-या व्यक्तीला दिला जाणारा सहकारातील सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील व सौ. योगिता शेरकर यांना प्रदान करण्यात आला. ५१ हजार रूपयांचा धनादेश स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी बोलताना राजस्थानचे उपमुख्यमंत्री ना. सचिन पायलट म्हणाले की, आपला देश शेतीप्रधान आहे. त्यामुळे देशातील नियम व कायदे बनविणा-या विधानसभा व लोकसभेत शेतकर्‍यांची मुले पाहिजेत. महाराष्ट्रात नव्याने आलेल्या महाआघाडी सरकारकडून जनतेच्या असलेल्या अपेक्षा सरकार नक्की पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ना.बाळासाहेब थोरात यांनी सहकार, शिक्षण, दूध व्यवसाय यामधून ग्रामीण विकास साधल्यामुळे ते सलग आठव्यांदा मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले आहेत. नम्रता  व जनमाणसांच्या ह्दयात असलेले स्थान हे नामदार थोरातांच्या यशाचे गमक असून हे सर्व नविन तरुण राजकारण्यांसाठी दिशादर्शक आहे. महाराष्ट्र व राजस्थानचे पुर्वीपासूनचे विश्‍वासाचे दृढ नाते आहे. यापुढेही आपल्याला संगमनेर व नगर जिल्ह्यात यायला आवडेल असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना विधानसभेचे अध्यक्ष ना. नाना पटोले म्हणाले की सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांचा ना.बाळासाहेब थोरात यांच्यावर प्रभाव आहे. त्यांच्यात विकासाची दृष्टी असून शांत व संयमाने ते सर्वांना एकत्रीत पुढे घेवून जात आहेत. सध्या राज्यात ब्रम्हा, विष्णू व महेश असे विकासाचे सरकार असून या सरकारने प्रथम शेतकर्‍यांची कर्जमाफी करुन एक मोठा ऐतिहासीक निर्णय घेतला आहे. मी विधानसभा अध्यक्ष म्हणून जनतेचा प्रतिनिधी म्हणून काम करणार असून जनतेची कामे सरकारकडून करुन घेणार आहे. २०२१ मध्ये जातीनिहाय जनगणना करावी असा ऐतिहासीक ठराव विधानसभेने पारित केला आहे असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर म्हणाले की, ना.बाळासाहेब थोरात हे राजकारणातील राम आहेत. सुसंस्कृत, शांत व संयमी माणूस राजकारणात यशस्वी होवू शकतो याचे ते आदर्श उदाहरण आहेत. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांची तत्वे, सहकार व ग्रामीण विकास विकासासाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या विचारांनी काम केल्यावर महाराष्ट्र हा देशात अग्रगण्य होईल असा विश्‍वास व्यक्त करतांना सध्या सोशल मिडीयामुळे वाढलेली असहिष्णुता दुर्देवी असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
महसूलमंत्री नामदार थोरात म्हणाले कि, तिर्थरुप भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे या विभागाच्या विकासाचा पाया घातला. भाऊसाहेबांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहकारात काम केले. डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्यामुळे भारत देश अन्न धान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाला आहे. या महान नेत्यांच्या विचारांवर संगमनेर तालुक्याचा सहकार काम करत आहे त्यामुळेच आपला तालुका विकासात राज्यामध्ये अग्रगण्य आहे.
पर्यावरण तज्ञ, डॉ.गिरीश गांधी व सत्यशील शेरकर यांचीही भाषणे झाली. यावेळी उल्हास लाटकर, विजयअण्णा बोर्‍हाडे, उत्कर्षाताई रुपवते, प्रा. बाबा खरात, डॉ. जयश्रीताई थोरात, बाबा ओहोळ, विश्‍वासराव मुर्तडक, अजय फटांगरे, सभापती सौ. सुनंदाताई जार्वेकर, शिवाजीराव थोरात, शंकरराव खेमनर, बाबसाहेब दिघे, श्रीकांत मापारी, अशोक खांबेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे स्वागत आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले, प्रास्ताविक ना. बाळासाहेब थोरात यांनी केले, सुत्रसांचलन नामदेव कहांडळ यांनी केले तर अ‍ॅड. माधवराव कानवडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.