38 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home राजकीय जनगणनेत ओबीसींचा समावेश न केल्यास बहिष्काराची भूमिका घ्यावी लागेल-नाना पटोले 

जनगणनेत ओबीसींचा समावेश न केल्यास बहिष्काराची भूमिका घ्यावी लागेल-नाना पटोले 

0
41

यवतमाळ दि.7:-: महाराष्ट्र विधानसभेत ओबीसी जनगणनेचा प्रस्ताव एकमताने मंजूर करून घेतला असला तरी हि वेळ केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्याची आहे. जनगणनेत जर ओबीसींचा कॉलम समाविष्ट करण्यात नाही आला तर ओबीसी समाजाने जनगणनेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घ्यावी लागेल असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ना.नाना पटोले यांनी येथे केले.
महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस, शेतकरी न्यायहक्क आंदोलन समिती व ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी आंदोलन फ्रंट यांच्या वतीने आयोजित सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. देशात बहुसंख्येने असलेल्या ओबीसींची जनगणना व्हावी हि अत्यंत रास्त मागणी आहे. त्याशिवाय या समाजघटकाला योग्य न्याय मिळणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने ओबीसी कॉलम समाविष्ट करावा यासाठी सर्वस्तरातून दबाव निर्माण झाला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावार होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार विजयाताई धोटे, माजी जी.प.अध्यक्ष प्रफुल्ल मानकर, विनोद पटोले, नानाभाऊ गाडबैले, वसंतराव घुईखेडकर, डॉ.दिलीप महाले, ज्ञानेश्वर गोरे, विलास काळे, डॉ.टि.सी.राठोड, गजानन अहमदाबादकर, उमेश डांगे, स्वाती येंडे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना पटोले म्हणाले कि महाआघाडी सरकारने पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे धोरण जाहीर केले. आता लवकरच शेतकऱ्यांना कर्जातून मुक्ती मिळेल त्याबद्दल महाआघाडी सरकारचे त्यांनी अभिनंदन केले. मात्र हे सरकार जेव्हा शेतकरी व जनसामान्यांच्या विरोधात निर्णय घेईल तेव्हा राजदंडाचाही वापर करण्यास आपण विचार करणार नाही असे ते म्हणाले.
यावेळी बोलतांना जेष्ठ विचारवंत डॉ.आ.ह.साळुंखे म्हणाले कि ओबीसी समाजघटकातून नसलो तरी नानाभाऊंनी ओबीसींच्या मागण्यांना विधानसभेत न्याय मिळवून द्यावा. व शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या आर्थिक मदतीला कर्जमाफी ऐवजी कर्ज परतफेड हा शब्द वापरावा असे आवाहन त्यांनी केले. यावर नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करून हा बदल करण्यास भाग पडणार असे सांगितले. शेतकऱ्यांना रानडुकरांचा होत असलेल्या त्रासामुळे त्यांना मारण्याच्या परवानगीसाठी सर्व विभागांशी चर्चा करणार असल्याचेही नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.
सत्कार कार्यक्रमात नानाभाऊ पटोले यांना विधानसभेची प्रतिकृती व चित्रकार उमेश चारोळे यांनी रेखाटलेले चित्र भेट देऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक व महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन विद्या चिंचोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंदूभाऊ चौधरी, उमेश इंगळे, साहेबराव पवार, प्रदीप डंभारे, मिलिंद धुर्वे, अशोक भुतडा, राजेंद्र हेंडवे, यशवंत इंगोले, विठ्ठल आडे, हेमंतकुमार कांबळे यांचेसह विविध संघटनांनी पुढाकार घेतला.