41.1 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home राजकीय ज्योतिरादित्य सिंधियांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

ज्योतिरादित्य सिंधियांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

0
210

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.11 – सुमारे 22 तासांच्या हो-नाही, हो-नाही नंतर अखेर ज्योतिरादित्य सिंधिया यांचा राजीनामा आला. रंगपंचमीच्या दिवशी दुपारी 12.10 वाजता सिंधिया यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यावरून राजीनामा देण्याचे पत्र ट्विट केले. मात्र हा राजीनामा 9 मार्च रोजी लिहिला होता. त्यानंतर अवघ्या 20 मिनिटांनंतर काँग्रेसने सिंधिया यांना पक्षातून काढून टाकण्याचे आदेश जारी केले. याच्या 5 मिनिटानंतर 12.35 वाजता सिंधिया समर्थक 14 आमदारांनी आपला राजीनामा विधानसभेला ईमेल केला. हे सर्व आमदार सोमवारपासून बंगळुरुत थांबले आहेत. आणखी काही आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे. यातच आता सूत्रांकडून मिळालेल्या नवीन माहितीनुसार, येत्या 11 ते 13 मार्चदरम्यान सिंधिया भाजपमध्ये सामील होऊ शकता. भाजप त्यांना राज्यसभेचे तिकीट देऊन केंद्रात मंत्रीपद देण्याच्या तयारीत आहे.
राजीनाम्यात लिहिले – मी काँग्रेसमध्ये काम करू शकणार नाही
“डिअर मिसेज गांधी, मी गेल्या 18 वर्षांपासून काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्य आहे. आता मी नव्याने सुरुवात करून पुढे जाण्याची वेळ आली आहे. मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. तुम्हाला माहिती आहेच, मागच्या वर्षीच हा मार्ग सुरू झाला. तथापि, माझे जनसेवेचे उद्दीष्ट पूर्वीपासून नेहमीसारखेच राहिले आहे, मी माझे राज्य आणि देशातील लोकांची त्याचप्रकारे सेवा करत राहीन. मला वाटते की हे काम या पक्षात (काँग्रेस) राहून यापुढे करू शकणार नाही. माझ्या लोकांबद्दल आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी, मला वाटतं की मी पुढे जाऊन एक नवीन सुरुवात केली पाहिजे. मला देशसेवेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि तुमच्या माध्यमातून माझे काँग्रेस पक्षातील सहकार्यांचे आभार.