धनगर आरक्षणावरून फडणवीसांचे शरद पवारांना सडेतोड उत्तर

0
6

मुंबई दि. १ – धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे केंद्राने अभिप्रायासाठी पाठविला होता. त्याला महाराष्ट्र सरकारने पाठिंबा दिला नाही असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर पलटवार करीत सडेतोड उत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आमचे सरकार 31 ऑक्टोबरला सत्तेत आले. पवारांनी मग त्यानंतर आठच दिवसांनी म्हणजे 8 नोव्हेंबरला याबाबत केंद्राला कसे काय पत्र लिहले? पवारांनी त्यांचे राज्यात सरकार असतानाच असा अभिप्राय का पाठवला नाही असा सवाल केला. धनगर आरक्षणावर अभ्यास करूनच अभिप्राय देऊ. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने मराठा आरक्षण घाईगडबडीत देऊन जसा फियास्को करून घेतला तसा धनगर आरक्षणाबाबत आम्हाला होऊ द्यायचा नाही त्यामुळेच थोडा वेळ लागला तरी चालेल पण योग्य असाच अभिप्राय केंद्राला पाठवू असे सांगत फडणवीसांनी पवारांना सडेतोड उत्तर दिले.
सत्तेत आल्यावर 15 दिवसांत धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देऊ, असे दिवास्वप्न भाजपने दाखविले होते. त्याच भाजपने या आरक्षणाच्या मुद्यावरून चक्क घूमजाव केले आहे. धनगर समाजाला आरक्षण देऊ, हा आमचा शब्द आहे असा निवडणुकीपूर्वी भाजपने केलेला दावा त्यांचेच केंद्रीय मंत्री जुएल ओराम यांनी खोटा ठरविला आहे, असा दावा पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी करीत खळबळ उडवून दिली होती.