36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या जिल्हावासियांना शुभेच्छा

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या जिल्हावासियांना शुभेच्छा

‘कोरोना’विरुद्धची लढाई एकजुटीने लढूया, जगासमोर महाराष्ट्राचा नवा आदर्श निर्माण करूया ! -  पालकमंत्री शंभूराज देसाई ·        जात, धर्म विसरून कोरोना विरोधात लढण्याचे आवाहन ·        प्रत्येकाने योग्य खबरदारी घेतल्यास ‘कोरोना’ हद्दपार होईल

0
71

blank

वाशिम, दि. 01 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६० वा वर्धापन दिन १ मे २०२० रोजी साजरा होत असून यानिमित्ताने वाशिमचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी वाशिम जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गामुळे सध्या राज्यासह जगभरात मोठे संकट थैमान घालत आहे. त्यामुळे यंदाचा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने व मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र स्थापनेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करून आणि त्यांच्या शौर्याची, पराक्रमाची आठवण ठेवून सर्वांनी कोरोना विरोधातील लढाईत एकजुटीने लढूया, या विषाणूला हद्दपार करून जगासमोर महाराष्ट्राचा नवा आदर्श निर्माण करूया, असे आवाहन पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले आहे.
महाराष्ट्र दिन साजरा करीत असतानाच आज आपण कोरोना विषाणूला पराभूत करण्यासाठी अनेक पातळीवर लढतो आहोत. देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. जिल्ह्यांच्या सीमा बंद करून जिल्ह्यातही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असले तरी जोपर्यंत प्रत्येकजण या लढाईत सहभागी होणार नाही, तोपर्यंत यामध्ये आपण यशस्वी होऊ शकणार नाही. रयतेचे स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते महाराष्ट्र स्थापनेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहेच. या सर्वांच्या पराक्रमाचे, शौर्याचे स्मरण करून, दृढ निश्चयाने, जिद्दीने आपण कोरोना विषाणू विरुद्ध लढा देणे आवश्यक आहे, असे पालकमंत्री श्री. देसाई म्हणतात.
या लढाईचे स्वरूप वेगळे आहे, या लढाईतील शत्रू सुद्धा अदृश्य आहे. पण तरीही या लढाईचे तंत्र आत्मसात करून, एकजुटीने लढा देवून या विषाणूवर मात करणे शक्य आहे. गर्दी टाळणे, शारीरिक अंतर ठेवणे, हात स्वच्छ धुणे, तोंडावर रुमाल अथवा मास्क बांधणे आदी खबरदारी घेण्याबरोबरच ताप, सर्दी व खोकला आल्यास तातडीने नजीकच्या फिव्हर क्लिनिकमध्ये जावून उपचार घेणे यासारख्या जबाबदाऱ्या या लढाईत प्रत्येकाने व्यवस्थितपणे पार पाडल्यास आपण या विषाणूला सहज हरवू शकतो. या विषाणूचा धोका वयोवृद्ध नागरिक व बालकांना अधिक आहे, त्यामुळे त्यांची सुद्धा विशेष काळजी घेण्याची गरज आहे, असे पालकमंत्र्यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.
कोरोना विषाणूचे संकट खूप मोठे आहे, मात्र त्यावर मात करणे शक्य आहे. कोरोना संसर्ग झाला म्हणजे सगळे संपले, असे नाही. कोरोना बाधित व्यक्ती सुद्धा बरा होतो, हे आपण पाहतो आहे, त्यामुळे मनामध्ये कोणतीही भीती न बाळगता, काहीही न लपवता कोरोनाची लक्षणे दिसताच उपचारासाठी समोर येणे आवश्यक आहे. तसेच आपल्या रक्षणासाठी झटणाऱ्या डॉक्टर, पोलीस यांना सुद्धा सहकार्य करणे गरजेचे आहे. रयतेच्या स्वराज्यासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसेच महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी आपले पूर्वज जात, धर्म विसरून एकजुटीने लढले. त्यामुळेच त्यांना आपल्या शत्रूवर मात करता आली. हा इतिहास डोळ्यासमोर ठेवूनच आपण कोरोना विरुद्धच्या लढाईत जात, धर्म विसरून एकदिलाने लढूया व कोरोना विषाणूला हद्दपार करूया, असे आवाहनही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले आहे.
आपण सध्या सातारा येथे मुक्कामी असून महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी वाशिम येथे होणाऱ्या ध्वजारोहण समारंभात सहभागी होण्याची मनोमन इच्छा आहे. मात्र, सातारा ते वाशिम दरम्यान प्रवासात रेड झोनमध्ये असलेल्या काही जिल्ह्यातून जावे लागते. सध्या वाशिम जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याने जिल्ह्याच्या सीमा बंद करून बाहेरील नागरिकांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत रेड झोनमधील जिल्ह्यांमधून प्रवास करून वाशिम येथे येणे संयुक्तिक होणार नाही. वाशिम जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेची आपल्यावर असलेली जबाबदारी लक्षात घेवून लॉकडाऊन व जिल्हाबंदीचे पालन करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. त्यामुळे आपण १ मे रोजी होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी संदेशात नमूद केले आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना व जिल्ह्यातील घडामोडींवर माझे लक्ष आहे. जिल्हा प्रशासनातील सर्वच घटक कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रामाणिकपणे काम करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आपला सद्यस्थितीत वाशिम जिल्हा कोरोनामुक्त आहे. यापुढेही या विषाणूला जिल्ह्यात प्रवेश मिळू नये, यासाठी आपण सर्वांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील जनतेला केले आहे.

blank