देशाच्या प्रगतीसाठी काम करताना पुरस्काराची आशा न बाळगता समाजसेवा करण्याचा संकल्प करा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0
20

मुंबई, दि. 27 : आपल्या देशाच्या प्रगतीसाठी काम करताना पुरस्काराची आशा न बाळगता समाजसेवा करण्याचा संकल्प करा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

राज्यस्तरीय स्काऊट गाईड पुरस्कार प्रमाणपत्र श्री. कोश्यारी यांच्या हस्ते शिवाजी पार्क येथील स्काऊट गाईड पॅव्हेलीयन येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड्सचे अध्यक्ष सुनील केदार, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, स्काऊट गाईडमध्ये काम करताना प्रमाणपत्र अथवा पुरस्काराची आशा न बाळगता समाजसेवा करावी. समाजसेवा केल्यानंतरचे जे आशीर्वाद मिळतात ते पुरस्कारापेक्षा खूप महत्त्वाचे असतात. या पुरस्काराने सर्वांना प्रोत्साहन मिळेल. आज तुम्ही राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला, यापेक्षा अधिक चांगले काम केल्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकाराल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रार्थना न करता प्रार्थनेमधील अर्थांची स्वतःच्या जीवनात अंमलबजावणी करा. काम करताना ते मनापासून उत्तम करण्याचा प्रयत्न करा. महाराष्ट्र राज्य हे स्काऊट गाईडच्या माध्यमातून समाजसेवक घडविण्यात देशात प्रथम स्थानी आहे. सामजिक जाण, सहकार्य, शांती, अहिंसा व सत्य हे गुण अखंडपणे जोपासणे गरजेचे आहे. त्यासाठी स्काऊट गाईडने आजवर योगदान दिले आहे. राज्यात अतिदुर्गम भाग असलेल्या ठिकाणी या चळवळीतून मुलांवर खूप चांगले संस्कार घडविले जाऊ शकतात असे त्यांनी सांगितले. यानिमित्ताने आपल्या शालेय जीवनातील स्काऊट गाईडच्या आठवणींना उजाळा देत  राज्यपाल यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

अनुशासन हीच यशस्वी मानवी जीवनाची गुरुकिल्ली – सुनील केदार

क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार म्हणाले,अनुशासन हीच यशस्वी मानवी जीवनाची गुरुकिल्ली आहे. सर्व क्षेत्रातील प्रगती साधण्यासाठी स्काऊट गाईडचे योगदान महत्त्वाचे आहे. स्काऊट गाईड, एनसीसी व क्रीडा यामध्ये शिस्त, शारीरिक स्वास्थ्य व मेहनत या बाबींचा समावेश आहे. जिल्हास्तरावर या तिन्ही माध्यमातून वार्षिक कार्यक्रम घेण्यासाठी विभाग पुढाकार घेईल असे श्री.केदार त्यांनी सांगितले.

स्काऊट गाईडच्या माध्यमातून घेण्यात येत असलेले कॅम्प अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. राज्यात स्काऊट गाईडची चळवळ मोठ्या प्रमाणावर राबविण्यासाठी सर्व शाळांमध्ये स्काऊट गाईड सुरु करून विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पुरस्कार प्राप्त विद्यार्थी व मार्गदर्शकांचे त्यांनी अभिनंदन केले.

उमेदीच्या वयामध्ये शालेय जीवनात झालेले लोकसेवेचे संस्कार हे भविष्यात दिर्घकालीन उपयुक्त ठरतात – कु.आदिती तटकरे

क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या, उमेदीच्या वयामध्ये शालेय जीवनात झालेले लोकसेवेचे संस्कार हे भविष्यात दिर्घकालीन उपयुक्त ठरतात. स्काऊट गाईडच्या माध्यमातून झालेला कोणताही शिस्तबद्ध कार्यक्रम हा वेगळ्या उंचीवर नेणारा असतो. अभ्यासक्रमाहून वेगळी चळवळ आणि त्यातील लोकसेवेच्या भावनेचा गौरव या माध्यमातून होत आहे. फ्री बिंग मी सारख्या चळवळीतून विद्यार्थीनींना व महिलांना सक्षम करण्यासाठी  स्काऊट गाईड चळवळ महत्त्वाची ठरते, असे म्हणून राज्यमंत्री कु. तटकरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पुरस्कार सोहळ्याचे प्रास्ताविक करताना क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया म्हणाले, राज्याच्या स्काऊट गाईड चळवळीमध्ये उल्लेखनीय कार्य करताना या विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक उपक्रमांतून नागरिकांना सेवा व सहकार्य केले आहे. कोरोनाच्या महामारी काळात शाळा व महाविद्यालये बंद असताना या चळवळीच्या माध्यमातून आपल्या स्तरावर सामाजिक बांधिलकी जपण्याची भूमिका या पुरस्कार प्राप्त व चळवळीतील सहभागी विद्यार्थ्यांनी जपली आहे. सामाजिक बदलासाठी शिस्तीच्या माध्यमातून उत्तम पायाभरणी स्काऊट गाईड चळवळ करीत आहे. ही चळवळ व्यापक करण्यासाठी अधिकाधिक उपक्रम स्काऊट गाईच्या माध्यमातून भविष्यात राबविले जातील, असे श्री.बकोरिया यांनी सांगितले.

सन 2018-19 व 2019-20 या वर्षांत स्काऊट गाईडच्या माध्यमातून स्वच्छता, आरोग्य, पक्षी व प्राणीमात्रांसाठी उपक्रम, पोलीओ जनजागृती शिबीरे, मास्क बनविणे, सॅनिटाईझर वाटप, रक्तदान व आरोग्य शिबीरे, दिनविशेष सादरीकरण, वृक्ष संवर्धन, कोरोना काळातील मदत, प्रथमोपचार प्रशिक्षण, स्टेट कॅम्प, वृक्षबंधन, वैज्ञानिक उपक्रम, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासानिमित्त 75 लाख सुर्यनमस्कार उपक्रम अशा विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींनी स्काऊट गाईडच्या माध्यमातून सहभाग घेतला आहे. राज्यस्तरीय पुरस्कारासह सुमारे 3 हजार विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती पुरस्कारासाठी आवश्यक चाचणी दिली असून, स्काऊट गाईडच्‍या माध्यमातून भविष्यात 1 कोटी विद्यार्थी स्काऊट गाईड चळवळीशी जोडणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईडचे राज्य सरचिटणीस एन.बी. मोते यांनी आभार व्यक्त करताना दिली.

यावेळी उपस्थित राज्यातील स्काऊट गाईड चळवळीशी संबंधित विद्यार्थी-विद्यार्थीनींनी मान्यवरांचे स्वागत, समूहगीत वाद्यवृंदांच्या सहाय्याने शिस्तबद्ध पद्धतीने केले.