राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम जिल्हास्तरीय उद्घाटन कार्यक्रम

0
27

गोंदिया,दि.26 : राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेअंतर्गत 25 एप्रिल रोजी जिल्हा परिषद शाळा कटंगी(कला) येथे जिल्हास्तरीय उद्घाटन कार्यक्रम जि.प.सदस्य पुजा सेठ यांचे अध्यक्षतेखाली,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, शालेय शिक्षक, समुदायिक आरोग्य अधिकारी, आशा स्वयंसेविका व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला. पात्र लाभार्थ्यांना वयोगटनिहाय ॲलबेंडाझोल गोळी खाऊ घालून सदर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

         गोंदिया जिल्ह्याअंतर्गत सर्व ग्रामीण व शहरी भागातील 1 ते 19 वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलींना सदर दिवशी ॲलबेंडाझोल गोळी देऊन जंतापासून संरक्षण करणे, पोषण स्थिती व जीवनाचा दर्जा उंचावणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. 25 एप्रिल (जंतनाशक दिन) रोजी प्रत्येक शाळास्तरावर, आंगणवाडी स्तरावर ॲल्बेंडाझोलची गोळी वयोगटनिहाय खाऊ घालण्यात येवून सदर दिनी शाळेत उपस्थित नसलेले मुला-मुलींना 29 एप्रिल रोजी मॉपअप दिनी गोळी खाऊ घालण्यात येणार आहे असे प्रास्ताविकातून डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांनी सांगितले.

        डॉ.नितीन वानखेडे यांनी 1 ते 19 वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी खाऊ घालण्याबाबत तसेच विद्यार्थी, पालकवर्ग तसेच शिक्षक व इतर कर्मचारी यांना कोविड नियमांचे पालन करणे व शारिरीक स्वच्छता तसेच परिसरातील स्वच्छता राखणेबाबत मार्गदर्शन केले.

        कार्यक्रमाच्या अध्यक्ष पुजा सेठ यांनी कार्यक्षेत्रातील सर्व वयोगटनिहाय मुला-मुलींना जंतनाशक गोळी खाऊ घालणे का आवश्यक आहे याबाबत माहिती दिली. तसेच सर्व शिक्षक वृंद व महिला बाल कल्याण विभाग यांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे असे आवाहन केले.

        कार्यक्रमाचे आयोजन समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.सरिता ठाकुर, अविनाश वऱ्हाडे, पुष्पा वरखडे, रेखा गजभिये, व जि.प.शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी केले.