अमरावती विद्यापीठाच्या यजमानपदाखाली आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धा

0
18

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या यजमानपदाखाली
पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल (महिला) सामन्यांचे 31 ऑक्टोबरला उद्घाटन
अमरावती,दि.30-संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या यजमानपदाखाली दिनांक 31 आक्टोबर ते 04 नोव्हंंेबर 2022 या कालावधीत विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर भव्य प्रमाणात पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल (महिला) सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन अमरावती शहर विभागाचे पोलीस उपायुक्त  विक्रम साळी यांच्या शुभहस्ते, तर प्र – कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांचे अध्यक्षतेखाली हा उद्घाटन सोहळा दिनांक 31.10.2022 रोजी सकाळी 8.00 वाजता विद्यापीठाचे क्रीडा संकुलावर संपन्न होणार आहे. यावेळी कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.

पाच राज्यांचे संघ होणार सहभागी
विद्यापीठ क्रीडा संकुलावर होत असलेल्या स्पर्धेत गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र या पाच राज्यांतील सुमारे 72 विद्यापीठांचे संघ आपल्या खेळांचे कौशल्य प्रदर्शन करतील. स्पर्धेमध्ये मागील वर्षीचा विजेता संघ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, स्वर्णीम गुजरात क्रीडा विद्यापीठ, गांधीनगर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर आणि लक्ष्मीबाई शारीरिक शिक्षण संस्था, ग्वॉलियर हे संघ आपले मानांकन टिकविण्यासाठी झंुज देतील. या स्पर्धा बाद आणि साखळी पद्धतीने संपन्न होतील.

उद्घाटन सत्रानंतर पहिल्या लढती
विद्यापीठ परिसरातील क्रीडा संकुलावर पुल ‘अ’, पुल ‘ब’, पुल ‘क’ व पुल ‘ड’ मध्ये स्पर्धा होणार असून उद्घाटन सत्रानंतर सकाळच्या सत्रात पुल ‘अ’ मध्ये गुजरात विद्यापीठ अहमदाबाद विरुध्द गोविंद गुरु ट्रायबल विद्यापीठ बनसवारा यांच्यात, पुल ‘ब’ मध्ये मुंबई विद्यापीठ विरुध्द राजस्थान विद्यापीठ, जयपूर, पुल ‘क’ मध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ विरुध्द डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, पुल ‘ड’ मध्ये केंद्रीय राजस्थान विद्यापीठ, अजमेर विरुध्द गोकुल ग्लोबल विद्यापीठ, सिध्दपूर, गुजरात यांच्यात लढत होणार आहे.

चार मैदानांची निर्मिती
विद्यापीठ परिसरातील क्रीडा संकुलावर व्हॉलीबॉल सामन्यांसाठी 4 सुसज्ज मैदानांची निर्मिती करण्यात आली आहे. या चारही मैदानावर दि. 31 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान सामने खेळले जाणार आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला तसेच क्रीडापटूंचा उत्साह वाढविण्याकरिता सर्व क्रीडाप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन या स्पर्धेचे आयोजन सचिव तथा विद्यापीठाचे क्रीडा संचालक, डॉ. अविनाश असनारे यांनी विद्यापीठाच्या वतीने केले आहे.