‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ मोहिमेत महिलांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी – जिल्हाधिकारी

0
18

गोंदिया- राज्यात एक लाख गर्भवती महिलांपैकी ३८ महिलांचा गरोदरपणात किंवा प्रसुतीवेळी मृत्यू होतो. दुसरीकडे, दरवर्षी १७ ते २0 हजार बालकांचा (0 ते ५) मृत्यू होतो. या पार्श्‍वभूमीवर महिला विशेषत: गर्भवती महिला व मुली १८ वर्षावरील सुरक्षित राहाव्यात, त्यांचे आरोग्य सुदृढ असावे, यासाठी नवरात्री उत्सवापासुन ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान जिल्ह्यात सुरू आहे.
कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना नोकरी व्यवसाय सांभाळणार्‍या महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्पर्धा हेच त्यामागील मुख्य कारण मानले जात आहे. फास्ट (जंक) फूड खाण्याची क्रेझ, व्यायाम नाही, अवेळी व अपुर्ण जेवण, अपुरी झोप, अतिरिक्त कामाचा ताण यामुळे आरोग्याकडे लक्ष द्यायला सुद्धा महिलांना वेळ मिळत नसल्याची वस्तू स्थिती आहे. दुसरीकडे, अजूनही सर्वत्र विशेषत: ग्रामीण भागातील मुली, महिला मासिक पाळी बद्दल मोकळेपणाने बोलत नाहीत. समस्या देखील अनेक जण लपवितात. परंतु, तसे करणे भविष्यासाठी धोकादायक असल्याचे भान त्यांना करुन देण्याची गरज आहे. गर्भाची वाढ न होणे, तसेच गर्भवतीचे वजन, उंची कमी असल्याने प्रसुतीवेळी अडचणी निर्माण होतात. सृष्टीची निर्माता समजली जाणारी ती सुरक्षित राहावी या उद्देशाने हे अभियान यशस्वीपणे राबवली जात आहे. महिल्यांच्या सुरक्षिततेसाठी राबविल्या जाणार्‍या या अभियानाचा १८ वर्षावरील मुलीं, महिलांनी लाभ घ्यावा आणि स्वत:चे आरोग्य सुरक्षित आहे का याची खात्री करावी, असे आव्हान जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे.
माता सर्वात जास्त दु:ख, वेदना सहन करते. कौटुंबिक व नौकरी, शिक्षणाच्या व्यापातून त्यांना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. पण या अभियानातून त्यांना तणावमुक्ती व मन: शांतीसाठी योगा, व्यायाम करा, जंकफुड न खाता घरात बनवलेले पोष्टिक जेवण खा, पुरेशी झोप, आराम करा, फळे खाण्याचा सल्ला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी दिली आहे.
जिल्ह्यात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानात आतापर्यंत एक लाख ६४ हजार ६0४ महिलांची, २२ हजार ९४९ गरोदर मातांची आरोग्य तपासणी झाल्याची माहिती डॉ. दिनेश सुतार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

आरोग्याची अशी घ्या काळजी
* पौष्टिक आहार घ्यावा, खजूर, शेंगालाडू, पालेभाज्या खाव्यात, आरोग्य केंद्रातून मोफत लोहयुक्त गोळ्या घ्या.
* दररोज कमीत कमी ४0 मिनिटे व्यायाम करावा, सूर्यनमस्कार, योगा, पायी चालावे.
* रक्तक्षय टाळण्यासाठी मोबाईलचा अतिवापर नको, व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या.
* महाविद्यालय मुलींनी जंक फूड, थंड पेये घेऊ नये, सायकलीवरून कॉलेजला जावे.
* गरोदर मातेने पहिले सात महिने दर महा,पुढील दोन महिने पंधरा दिवसाला, शेवटी आठवड्यातून एकदा आरोग्य तपासणी करावी.

महात्मा जनआरोग्यमधून मोफत उपचार
गर्भवती मातांना किंवा इतर महिला, मुलींना राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत तीन लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येतो. त्याअंतर्गत जवळपास तेराशे आजारांचा समावेश आहे. उपचाराचा खर्च वाढल्यास केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेतून पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळू शकतात. ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानातून गंभीर आजार होऊ शकणार्‍या किंवा झालेल्या महिलांचा शोध घेऊन त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

अभियानातील आतापर्यंतची निरीक्षणे
* रक्तक्षय (अँनिमिया), थायरॉईडची (पुढे जाऊन गर्भधारणेस अडथळा होतो) समस्या
* मासिक पाळीत अनियमितता, श्‍वेतप्रदरची लक्षणे
* अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाबाची सुरुवात झाल्याचे दिसून येते
* स्तन व तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे, गर्भाशयाच्या मुखासंबंधी अनेक समस्या
* कामाच्या व्यापात महिला करतात स्वत:च्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष