उद्या दिव्यांग क्रीडा स्पर्धा कार्यक्रमात अध्ययन अक्षम मुलांना मिळणार प्रमाणपत्र

0
15

गोंदिया, दि. 02 : समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद गोंदिया, सहायक आयुक्त समाज कल्याण व दिव्यांगाच्या शासनमान्य विशेष शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त शनिवार  03 डिसेंबर रोजी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमातच गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्ययन अक्षम मुलांना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.याकरीता जिल्ह्यातील 5 मुलांची निवड समग्र शिक्षा अभियानांतर्गत करण्यात आली आहे.या मुलामध्ये दिक्षा नरेश भोगांडे वर्ग 10,नशिब राजू पटले वर्ग 9,श्रध्दा नरेश बोरकर वर्ग 10,रुद्र राजेश लोहाडे वर्ग 9 व आकाश नंदकुमार बडोले वर्ग 11 यांचा समावेश आहे.

पोलीस मुख्यालय मैदान कारंजा येथे होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी नयना गुंडे असणार आहेत तर जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे ,वैद्यकीय महाविद्यालाचे अधिष्ठाता डॉ कुसुमाकर घोरपडे, डाएटचे प्राचार्य तथा नोडल अधिकारी राजेश रुद्रकार, शिक्षणाधिकारी डॉ.महेन्द्र गजभिये व कादर शेख,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद जनार्दन खोटरे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

       03 डिसेंबरला सकाळी इंदिरा गांधी स्टेडियम ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यापर्यंत दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. त्यानंतर स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धेचे बक्षीस वितरण 8 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे पंतगा मैदान गोंदिया येथे सकाळी 11 वाजता होणार आहे. या स्पर्धेला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून दिव्यांग विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा व त्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी संजय गणवीर व सहायक आयुक्त समाज कल्याण विनोद मोहतुरे यांनी केले आहे.