मुंबईत रविवारपासून राज्यस्तरीय कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धांचे आयोजन

0
8

मुंबई, दि. 4 :  राज्यस्तरीय कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धेस उद्या, रविवार दि. ५ फेब्रुवारी २०२३ पासून सुरुवात होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या श्रमिक जिमखाना, लोअर परेल येथे आमदार अजय चौधरी, कामगार विभागाचे अवर सचिव दिलीप वणिरे, सोफिटेल रिसॉर्ट अँड हॉटेलचे संचालक सलील देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चंद्रमोरे व कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. ५ ते ७ फेब्रुवारीदरम्यान दररोज संध्याकाळी कुस्त्यांचे सामने खेळवले जातील. सामने मॅटवर खेळवले जाणार असून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमांप्रमाणे व मुंबई शहर तालीम संघाच्या सहकार्याने ही स्पर्धा होत आहे.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने कामगारांसाठी कामगार केसरी आणि कामगार पाल्यांसाठी कुमार केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यासह विविध पाच वजनी गटातील सामने यावेळी खेळवले जाणार आहेत. कामगार केसरी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रु. 75 हजार, द्वितीय रु. 50 हजार, तृतीय रु. 35 हजार व उत्तेजनार्थ रु. 20 हजार आहे. तर कुमार केसरी स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु. 50 हजार, द्वितीय रु. 35 हजार, तृतीय रु. 20 हजार व उत्तेजनार्थ रु. 10 हजार आहे. तसेच वजनी गटात रु. 10 हजार ते 25 हजारांची पारितोषिके दिली जातील.

बजाज ऑटो वाळूंज, कुंभी कासारी सह. साखर कारखाना कोल्हापूर, वडगांव यंत्रमाग वस्त्रोद्योग, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना सोलापूर, विमा साखर डिस्टिलरीज सोलापूर, क्रांती अग्रणी साखर कारखाना कुंडल आदी कंपन्यांच्या 106  हून अधिक नामांकित पैलवानांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने स्पर्धेस उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.