शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

0
12

गोंदिया, दि.28 :  क्रीडा विभागामार्फत क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार / जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

            14 डिसेंबर 2022 च्या शासन निर्णयानुसार काही खेळाडूंचे फेडरेशन कप स्पर्धांचे गुणांकन होत नसल्यामुळे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या वर्षाकरीता अर्ज सादर करु शकले नाहीत. त्यामुळे त्यांचे नुकसान होऊ नये व सदर खेळाडू पुरस्कारापासून वंचित राहू नये याकरीता अशा खेळाडूंनी (शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरीता पात्र खेळांमधील ज्या खेळांच्या फेडरेशन कप स्पर्धा होताच असे सहभागी/प्राविण्यप्राप्त खेळाडू फक्त) त्यांचे प्रस्ताव व विहित नमुन्यातील अर्ज 31 मार्च 2023 पर्यंत संबंधीत जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडे सादर करावेत, असे क्रीडा विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.

14 डिसेंबर 2022 च्या शासन निर्णयान्वये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी  नियमावली विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या तीन स्वतंत्र  वर्षांच्या पुरस्कारासाठी राज्यातील जेष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांच्यामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचे नमुने https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घेऊन, व्यवस्थितरित्या भरुन संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे.

            शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2023 पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या  संकेतस्थळावरील ताज्या बातम्या मधील लिंकवर पहावे. पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याऱ्या गोंदिया जिल्ह्यातील इच्छुक खेळाडूंनी विहित मुदतीत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी केले आहे.