आंतरराष्ट्रीय स्पर्धा : खेळाडूंना मिळणार आर्थिक सहाय्य  खेळाडूंकडून प्रस्ताव मागविले

0
6

 वाशिम, दि. 30 : राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन परिणामकारक करण्याच्या दृष्टीने तसेच राज्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीयस्तरावर दर्जेदार कामगिरी करून पदक विजेते खेळाडू तयार व्हावेत यासाठी क्रीडाविषयक तंत्रशुध्द प्रशिक्षण, खेळाडूंच्या दर्जात सुधारणा, दर्जेदार पायाभुत सुविधा, खेळाडूंचा गौरव, क्रीडा प्रशिक्षकांना अद्यावत तंत्रज्ञानाची ओळख या बाबी विचारात घेऊन क्रीडा धोरण २०१२ तयार करण्यात आले आहे. या अंतर्गत राज्यातील खेळाडूंना अधिकृत आंतराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना आर्थिक सहाय्य देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

          या निर्णयाव्दारे ही योजना संचालनालयस्तरावर कार्यान्वित आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना पुढील बाबीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. आंतराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास, भोजन इत्यादी. देश विदेशातील स्पर्धापूर्व प्रशिक्षण उपकरणे, तज्ञ क्रीडा प्रशिक्षकांचे मार्गदर्शक शुल्क, प्रशिक्षण कार्यक्रम शुल्क, आधुनिक क्रीडा साहित्य, आयात/ खरेदी करणे  व गणवेश इत्यादीसाठी ऑलिम्पिक गेम्स, विश्व अजिंक्यपद स्पर्धा, एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा, राष्ट्रकुल युवा स्पर्धा, एशियन चॅम्पियनशिप, युथ ऑलिम्पिक, ज्युनिअर विश्व अजिंक्यपद स्पर्धा, शालेय आशियाई/ जागतिक स्पर्धा, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा, पॅरा एशियन स्पर्धा, ज्युनिअर एशियन चॅम्पियनशिप, एशियन कप व वर्ल्ड कप या स्पर्धांना अधिकृत स्पर्धा म्हणून मान्यता दिली आहे.

         ऑलिम्पिक स्पर्धामध्ये ज्या खेळ/ क्रीडा प्रकारांचा समावेश असेल तेच खेळ/ क्रीडा प्रकार वरील नमुद इतर स्पर्धामध्ये आर्थिक सहाय्य मिळण्यास पात्र असतील. मात्र अपवाद कबड्डी, खो-खो, मल्लखांब या देशी खेळांचा अपवाद आहे. विविध अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किंवा सहभागी झालेल्या खेळाडूंना या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज परिपुर्ण भरून आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी, वाशिम कार्यालयामार्फत किंवा आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, संचालनालय,
महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे यांच्याकडे सादर करावे. असे आवाहन आयुक्त,
क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केले आहे. अर्जाचा नमुना क्रीडा विभागाच्या  sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलबध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, वाशिम यांचे कार्यालय किंवा क्रीडा व युवक सेवा संचालनालय, शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेबाडी, पुणे येथील कार्यालयाशी संपर्क साधावा. असे जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी कळविले आहे.