अर्जुनी मोरगाव:स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जे.डी.पठाण, पर्यवेक्षिका छाया घाटे,प्रा.टोपेश बिसेन, क्रीडा शिक्षक महेश पालीवाल, वरिष्ठ शिक्षक शशिकांत लोणारे उपस्थित होते.सर्वप्रथम मेजर ध्यानचंद व कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. मेजर ध्यानचंद यांनी ज्या समर्पित भावनेने खेळासाठी स्वतःला झोकून दिले तशी समर्पणाची भावना प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या अंगात भीनवावी असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून प्राचार्य जे.डी. पठाण यांनी केले. पर्यवेक्षिका छाया घाटे व क्रीडा शिक्षक महेश पालीवाल,माधुरी पिलारे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार वर्ग दहावीचा विद्यार्थी संस्कार शेकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले.