. राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
गोंदिया,दि.30 : आजच्या धकाधकीच्या युगामध्ये नागरिकांची जीवनशैली शारिरीकदृष्ट्या निष्क्रीय होत आहे. त्यामुळे ‘बळकट शरीरात बळकट मन’ या युक्तीप्रमाणे नागरिकांना शारिरीक तंदुरुस्ती व आरोग्य संपन्न जीवन जगता यावे, यासाठी खेळाच्या माध्यमातून शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी आरोग्य संपन्न व कार्यक्षम जीवन ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन पं.स.चे महिला व बालकल्याण विस्तार अधिकारी तीर्थराज उके यांनी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने 29 ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांच्या जन्म दिनानिमीत्त ‘राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन’ जिल्हा क्रीडा संकुल, गोंदिया येथे करण्यात आले, त्यावेळी ते कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी क्रीडा अधिकारी अनिराम मरसकोले हे होते. प्रमुख अतिथी म्हणून तालुका क्रीडा अधिकारी ओमकांता रंगारी, तालुका क्रीडा संयोजक विकास कापसे, तसेच विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी म्हणून अनिल सहारे, अविनाश बजाज, अमर गांधी, श्री. कुसराम, ऋतुराज यादव, विनेश फुंडे, जागृत सेलोकर, स्नेहदिप कोकाटे, पृथ्वी रामटेके, श्री. सागर यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलीत करुन ऑलिम्पिक स्वर्ण कालखंडाचे शिल्पकार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणातून क्रीडा अधिकारी अनिराम मरसकोले म्हणाले, हॉकीचे महान जादूगर मेजर ध्यानचंद यांची जयंती ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ म्हणून आपण साजरी करतो. मेजर ध्यानचंद यांनी हॉकीच्या मैदानात भारतासाठी अविश्वसनीय कामगिरीची नोंद केली आहे. त्यांच्या कारकिर्दीत भारताने सन 1928, 1932 आणि 1936 असे तीन वेळा ऑलिम्पिक स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले. त्यांच्या खेळाची जादू अनेक दशकानंतर आजही भारतीयांच्या मनावर कायम आहे. केंद्र सरकारने 1956 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविले. मेजर ध्यानचंद हे भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या जयंतीदिनी साजरा होणारा राष्ट्रीय क्रीडा दिन भारतीय क्रीडा जगतासाठी सर्वात महत्वाचा दिवस आहे असे सांगून ते पुढे म्हणाले की, भारतीय क्रीडा संस्कृतीचे जतन व संवर्धन करुन मेजर ध्यानचंद यांच्यापासून उदयोन्मुख खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी व देशाच्या काणाकोपऱ्यापर्यंत खेळाची जागृकता निर्माण करावी. प्रत्येक खेळाडू ही देशाची आन-बाण-शान आहे, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद गोंदिया, नेहरु युवा केंद्र व जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटना, शिवछत्रपती बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्रीडा स्पर्धा व क्रीडा विषयक उपक्रमाचे आयोजन 21 ते 29 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये जिल्ह्यात करण्यात आले.
सदर स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या 41 ते 60 वर्ष वयोगटात 1 कि.मी. चालणे- श्री. फारुख. 18 ते 40 वर्ष वयोगटात बादल कटरे, श्रमिक डोंगरवार, विनेश फुंडे. चमचा गोळी मुले- रितीक मस्करे, राहुल राऊत, रौनक महंत. चमचा गोळी मुली- पायल उईके, आर्या मिसार. 41 ते 60 वर्ष वयोगटात 50 मीटर धावणे- श्री. फारुख, श्री. पुरी, अनिश चौव्हाण. 12 वर्ष मुली 50 मीटर धावणे- स्विकृती बुरबुरे, चैतन्य माऊले. 41 ते 60 वर्ष 300 मीटर चालणे- श्री. फारुख, लक्ष्मण पुरी, लोकेश माऊले आदी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते मेडल्स व पुष्पगुच्छ प्रदान करुन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनेश फुंडे यांनी केले. उपस्थितांचे आभार माधुरी परमार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवचरण चौधरी, किसन गावड, आकाश भगत, शेखर बिरणवार, सुमित सुर्यवंशी, जयश्री भांडारकर यांनी परिश्रम घेतले.