गोंदिया, दि.29 : अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व शारीरिक विकासाच्या अनुषंगाने विभागीय क्रीडा स्पर्धा शैक्षणिक सत्र 2023-24 चे आयोजन इतिहासात प्रथमच तालुका क्रीडा संकुल देवरी येथे 2 डिसेंबर 2023 ते 4 डिसेंबर 2023 या कालावधीत करण्यात आलेले आहे.
या विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये गडचिरोली, भामरागड, अहेरी, चंद्रपूर, चिमूर, नागपूर, वर्धा, भंडारा व देवरी अश्या एकूण 9 प्रकल्पातील 1503 मुले व 1291 मुली असे एकूण 2794 खेळाडू विद्यार्थी सहभागी होत आहेत. 14, 17 व 19 वर्षे मुले व मुली अश्या 3 वयोगटामध्ये वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. वैयक्तिक क्रीडा स्पर्धेमध्ये थाळीफेक, भालाफेक, गोळाफेक तसेच धावण्याच्या सर्व प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तर सांघिक स्पर्धांमध्ये कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल व हँडबॉल या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारातील विजयी विद्यार्थी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत.
सर्व बाहेरून येणाऱ्या खेळाडू विद्यार्थी व कर्मचारी यांच्या निवासाची व्यवस्था शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा बोरगाव बाजार व एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल बोरगाव बाजार येथे करण्यात आलेली आहे तर भोजनाची व्यवस्था तालुका क्रीडा संकुल देवरी येथे करण्यात आली आहे.
या विभागीय क्रीडा स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नागपूर विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध समित्या तयार करण्यात आल्या असून अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांची सभा 27 नोव्हेंबर 2023 ला सांस्कृतिक सभागृह देवरी येथे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यामध्ये सर्वांना विभागीय क्रीडा स्पर्धेच्या कामाची रूपरेषा समजावून सांगण्यात आली. विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही तसेच सदर विभागीय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्याच्या दृष्टीने आपल्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी यात कोणत्याही प्रकारची कसूर होणार नाही याची दक्षता घेऊन विभागीय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्या संबंधाने सर्व समिती प्रमुख व सदस्य यांना निर्देश देण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून खेळाडू विद्यार्थ्यांचे मनोबल उंचवावेत असे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले.
देवरी येथे 3500 विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्या निवासाची व्यवस्था व सोबतच आवश्यक मूलभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. स्पर्धेकरीता येणाऱ्या सर्वांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न व्हावी म्हणून प्रकल्पातील सर्व कर्मचारी काम करीत आहेत.