खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात करियर करण्याची संधी – नंदा खुरपुडे

0
2

गोंदिया, दि.17 : सुदृढ, निरोगी व आनंददायी जीवन जगण्यासाठी क्रीडा व खेळांची नितांत आवश्यकता आहे. आज क्रीडा क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान व अद्ययावत क्रीडा सुविधा निर्माण होत असून, खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात करियर करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे, त्याचा लाभ नवोदित खेळाडूंनी घ्यावा असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी राज्य क्रीडा दिनाच्या उदघाटन प्रसंगी केले.

         प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व ऑलम्पिकवीर स्व. खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पित करण्यात आले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा विविध क्रीडा संघटना गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने ऑलम्पिकवीर स्व. खाशाबा जाधव यांचा जन्मदिन 15 जानेवारी “राज्य क्रीडा दिन” म्हणून जिल्हा क्रीडा संकुल, मरारटोली, गोंदिया येथे आयोजित करण्यात आला होता.

       सदर कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून तीर्थराज उके, विस्तार अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग, पंचायत समिती, एस.ए. वहाब, सचिव जिल्हा व्हॉलीबॉल, कबड्डी व खो-खो असोसिएशन, पराग खुजे, जिल्हा समन्वयक, जिल्हा स्काउट व गाईड, आनंद मकवाना, सचिव बेसबॉल असोसिएशन, अमर गांधी सहसचिव, जिल्हा रायफल असोसिएशन, विनेश फुंडे, शेखर बिरनवार प्रामुख्याने उपस्थित होते.

         यावेळी आनंद मकवाना, तीर्थराज उके व एस.ए. वहाब यांनी ऑलम्पिकवीर स्व.खाशाबा जाधव यांची जीवनगाथा व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान या विषयावर व्याख्याने आयोजित करण्यात आली. राज्य क्रीडा दिनानिमित्त सकाळपासूनच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. यामध्ये प्रामुख्याने क्रीडा रॅली, मॅराथॉन व क्रीडा मार्गदर्शक यांच्या माध्यमातून विविध खेळांची नियमावली, नामवंत खेळाडू समवेत संवाद, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, तलवारबाजी, लॉन टेनिस, क्रिकेट खेळाचे प्रदर्शनीय सामने व विजेत्यांचा सत्कार. तसेच प्रशिक्षक, नवोदित खेळाडू, शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनी-पालक तसेच क्रीडाप्रेमी नागरिक यांच्यासोबत करिअर संधीबाबत परिसंवाद व चर्चासत्रे व जिल्हा क्रीडा संकुलातील क्रीडा सुविधाची माहिती व भेटी देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करुन उपस्थितांचे आभार क्रीडा अधिकारी ए.बी. मरसकोले यांनी मानले. विविध क्रीडा विषयक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रविंद्र वाळके, आकाश भगत, शिवचरण चौधरी, जयश्री भांडारकर,किसन गावड, रवि परिहार यांनी विशेष परिश्रम घेतले.