खेळाडूंना दर्जेदार कामगिरी करण्यासाठी क्रीडा विषयक तंत्रशुध्द प्रशिक्षण आवश्यक – नंदा खुरपुडे

0
2

गोंदिया, दि.18 : खेळाचा प्रचार-प्रसार जोपासना व क्रीडा संस्कृतीचे संवर्धन यासोबतच खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करण्यासाठी क्रीडा विषयक तंत्रशुध्द प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी व्यक्त केले.

        जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे आयोजित विविध खेळांचे प्राथमिक कौशल्य विकास उन्हाळी प्रशिक्षण शिबीर कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रशेखर आंबोळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून अविनाश बजाज, चेतन मानकर, अनिल सहारे, विशाल ठाकुर, अमर गांधी, जागृत सेलोकर, संदीप मेश्राम, ऋतुराज यादव, श्री. आलोत, अंकुश गजभिये, विनेश फुंडे व श्री. सागर उपस्थित होते.

        महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र व विविध खेळ संघटना गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने 15 मे 2024 रोजी जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करुन उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

       या शिबिरामध्ये व्हॉलीबॉल, स्केटींग, क्रिकेट, सॉफ्ट-टेनिसबॉल, बास्केटबॉल, तलवारबाजी, कबड्डी, कराटे, योगा, ॲथलेटीक्स, टेबल टेनिस, बॅडमिंटन, जलतरण, सेपक टाकरा खेळामध्ये मोठ्या प्रमाणात खेळाडू सहभागी झाले होते. सदर शिबीर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी 15 ते 27 मे 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आलेले आहे.

        जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रशेखर आंबोळे यांनी समस्त क्रीडाप्रेमींना सुदृढ आरोग्याची कामना करुन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा क्रीडा पुरस्कार्थी अनिल सहारे व चेतन मानकर यांनी मौलिक मार्गदर्शन केले.

        कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्रीडा अधिकारी ए.बी.मरसकोले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अंकुश गजभिये यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रविंद्र वाळके, शेखर बिरनवार, किसन गावड, शिवचरण चौधरी, रवी परिहार व निकिता बोरकर यांनी परिश्रम घेतले.