- नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा
- बक्षिस वितरण व समारोप समारंभ
- सहा जिल्ह्याच्या चमुंचा सहभाग
गोंदिया, दि.16 : जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. अभ्यासाने आपला बौध्दिक विकास होतो तर खेळामुळे आपला शारीरिक विकास होत असतो. खेळामुळे ताणतणाव दूर होवून आपले आरोग्य उत्तम राहते तसेच सांघिकतेची आणि एैक्याची भावना वाढीस लागते. स्पर्धकांनी जसे नागपूर विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत यश संपादन केले, तसेच याहीपेक्षा जास्त सराव करुन येत्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेत सहभागी होवून दैदिप्यमान कामगिरी करुन आपल्या जिल्ह्याचा, परिक्षेत्राचा व महाराष्ट्र पोलीस दलाचा नावलौकीक करावा, असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी केले.
दिनांक 11 ते 15 डिसेंबर 2024 दरम्यान गोंदिया येथे नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 15 डिसेंबर रोजी सदर क्रीडा स्पर्धेच्या बक्षिस वितरण व समारोप समारंभ कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना डॉ. भुजबळ बोलत होते.
यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र कॅम्प नागपूर अंकीत गोयल, पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे, पोलीस अधीक्षक भंडारा नुरुल हसन, पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर रिना जनबंधू, पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. निलोतपल, पोलीस अधीक्षक वर्धा अनुराग जैन व अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया नित्यानंद झा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ. दिलीप पाटील-भुजबळ पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्य पोलीस अधिकारी-अंमलदार यांच्या अंगी खेळाडू वृत्ती जोपासली जावी, त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचा विकास व्हावा, त्यांचे मनोबल वाढावे, तसेच पोलीस म्हणून दैनंदिन कर्तव्य पार पाडत असतांना निर्माण होणाऱ्या अडी-अडचणी, ताण-तणावातून काहीशी विश्रांती मिळावी, तसेच त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य निरोगी रहावे यासाठी दरवर्षी पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी नागपूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद गोंदिया जिल्ह्याने भूषविले होते. या पोलीस क्रीडा स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन करुन यजमानपद भूषविणारे गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे तसेच जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, कॅम्प नागपूर अंकीत गोयल म्हणाले, सदर पोलीस क्रीडा स्पर्धेत ज्या खेळाडूंना विजेतेपद मिळाले नाही त्यांनी निराश न होता पुन्हा अधिक जोमाने जास्त सराव करुन आपले कलाकौशल्य दाखवून अधिक परिश्रम घेवून तसेच आपले मनोबल वाढवून आगामी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेत सहभाग घेवून विजेतेपद मिळविण्याचे प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी सांगितले की, यावर्षी नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे यजमानपद गोंदिया जिल्ह्याने भूषविले होते. सदर क्रीडा स्पर्धा 11 ते 15 डिसेंबर 2024 दरम्यान गोंदिया येथील पोलीस कवायत मैदान कारंजा, जिल्हा क्रीडा संकुल व इंदिरा गांधी स्टेडियम येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या क्रीडा स्पर्धेत गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर ग्रामीण व वर्धा अशा सहा जिल्ह्यातील पुरुष खेळाडू 700 व महिला खेळाडू 200 असे एकूण 900 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. या क्रीडा स्पर्धेत सहा जिल्ह्यातील सहा संघांमध्ये सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यात प्रामुख्याने सांघिक क्रीडा प्रकारात फुटबॉल, हॉकी, हँडबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, व्हॉलिबॉल, खो-खो, बॉक्सिंग, कुस्ती, तायक्वांडो, वु-शू, तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारात ॲथलेटिक्स, ज्युडो, वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग इत्यादी क्रीडा स्पर्धा पुरुष व महिला गटात घेण्यात आल्या असे त्यांनी सांगितले.
सदर पोलीस क्रीडा स्पर्धेत पुरुष गटात चंद्रपूर जिल्ह्याला पहिले चॅम्पीयनशीप मिळाले व महिला गटात गडचिरोली जिल्ह्याला पहिले चॅम्पीयनशीप मिळाले. यावेळी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) नंदिनी चानपूरकर, राखीव बटालियन पोलीस निरीक्षक रमेश चाकाटे, डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांच्या पत्नी निलिमा पाटील-भुजबळ,जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी मुख्याध्यापिका मंजुश्री देशपांडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी मानले. पुढच्या वर्षी होणाऱ्या नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे यजमानपद भंडारा जिल्ह्याने भूषविले आहे.