राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा द्या-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
28
क्रीडा व युवक कल्याण विभागाकडील शंभर दिवसात करावयाच्या उपक्रमाचा आढावा
मुंबई, दि. २७ : विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या राज्यातील स्पर्धकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा द्या, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत शंभर दिवसात करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथील बैठकीत घेतला.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूस आवश्यक सेवा सुविधा मिळाव्यात याबाबत क्रीडा विभागाने योग्यती कार्यवाही करावी. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी खेळाडू सोबत जाणाऱ्या मार्गदर्शक, फिजिओथेरपिस्ट यांचा खर्च क्रीडा विभागाने करण्याबाबत नियोजन करावे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी खेळाडूंना आवश्यक असलेला व्हिसा लवकर मिळावा यासाठीही क्रीडा विभागाने समन्वय करावा.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्यातील खेळाडूंना अधिक संधी मिळाली पाहिजे यासाठी शालेयस्तरावर विद्यार्थ्यांचे क्रीडा गुण अधिक विकसित झाले पाहिजेत. यासाठी जिल्हास्तरावर अधिक स्पर्धा घ्याव्यात. या स्पर्धांसाठी जिल्हा क्रीडा संकुलांचा अधिकाधिक वापर व्हावा, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.
क्रीडा विभागामार्फत १०० दिवसाच्या कालावधीत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन २०२२-२०२३ व २०२३-२०२४ वितरण करणे, गट अ आणि ब करिता पात्र खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती आदेश देणे, मिशन लक्ष्यवेध, विभागीय क्रीडा संकुल नागपूर, विभागीय संकुल, शिंपोली मुंबई, आणि पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मधील पदक प्राप्त खेळाडू व मार्गदर्शकांना बक्षीस वितरण आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मा. मुख्यमंत्री महोदयांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे सचिव श्रीकर परदेशी, मदत व पुनर्वसन व विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, मत्स्यव्यवसाय सचिव डॉ. रामस्वामी एन. आदी उपस्थित होते.क्रीडा विभागाचे सादरीकरण अतिरिक्त मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी केले.