३८ व्या राष्ट्रीय आंतर विद्यापीठीय युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाची उत्कृष्ट कामगिरी

0
18

८ सुवर्ण पदकांसह ३ रौप्य आणि १ कांस्य पदकांची कमाई करत मिळवला उपविजेतेपदाचा बहुमान

मुंबई, दि. ०७ मार्चः ३८ व्या राष्ट्रीय आंतर विद्यापीठीय युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ८ सुवर्ण पदके, ३ रौप्य आणि १ कांस्य पदकांची कमाई करत मुंबई विद्यापीठास उपविजेतेपदाचा बहुमान मिळाला आहे. या राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने एकूण ८६ गुणांची कमाई केली आहे. भारतीय विद्यापीठे संघ (एआययु) यांच्या निर्देशानुसार ०३ मार्च ते ०७ मार्च २०२५ या दरम्यान अमिटी विद्यापीठ, नोएडा येथे या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात देशातील १४८ विद्यापीठे सहभागी झाली होती.

संगीत, नाट्य, नृत्य, साहित्य आणि ललितकला या पाच विभागात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये मुंबई विद्यापीठाने संगीत विभागातून भारतीय सुगम संगीत गायन, भारतीय शास्त्रीय गायन, भारतीय शास्त्रीय तालवाद्य, पाश्चिमात्य वाद्य एकल वादन या स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले. तर पाश्चिमात्य समुह गायन व पाश्चिमात्य एकल गायन या स्पर्धांमध्ये रौप्य पदक आणि भारतीय समुह गायन स्पर्धेत कांस्य पदक प्राप्त केले आहे. नाट्य विभागातील प्रहसन स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. साहित्य विभागातील वादविवाद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे. तसेच ललित कला विभागातील झालेल्या स्पर्धांमध्ये रांगोळी आणि व्यंगचित्र स्पर्धेतही सुवर्ण पदक जिंकले आहेत. विशेष म्हणजे सहभागी १४८ विद्यापीठांनी सादर केलेल्या शोभायात्रा स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठास सुवर्ण पदकाचा बहुमान मिळाला आहे. संगीत या विभागामध्ये सर्वात जास्त गुणांची कमाई करून मुंबई विद्यापीठाने संगीत विभागातील अंतिम सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले आहे.

हा राष्ट्रीय महोत्सव दोन फेऱ्यांमध्ये आयोजित केला जातो. स्पर्धेची प्राथमिक फेरी संपूर्ण देशात सात क्षेत्रीय विभागात आयोजित केली जाते. या प्रत्येक क्षेत्रीय विभागातील प्रत्येक स्पर्धेच्या प्रथम, द्वीतीय आणि तृतीय पारितोषिक विजेत्यांना अंतिम फेरीत सहभागी होता येता येते. ०४ ते ०८ जानेवारी २०२५ दरम्यान गणपत विद्यापीठ, महेसाना, गुजरात येथे आयोजित केलेल्या प्राथमिक फेरीमध्ये पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठास १२ पदकांची कमाई करत या राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभाग घेतला. मुंबई विद्यापीठाच्या चमूने केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी विजयी चमूचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेचे यशस्वी नियोजन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील आणि सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे यांनी केले.