
गोंदिया, दि.18 : महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरीता प्रतिभावंत खेळाडूंची निवड करुन शास्त्रोक्त प्रशिक्षण शिक्षण भोजन, निवास, अद्यावत क्रीडा सुविधा, क्रीडा प्रबोधिनीच्या अंतर्गत खेळाडूंना देण्यात येत आहेत. राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ सेवा प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचण्यांद्वारे निवासी व अनिवासी खेळाडूंना सन 2025-26 प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी चाचण्यांचे आयोजन करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे.
क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळसेवा प्रवेश प्रक्रिया व खेळनिहाय कौशल्य चाचणी याबाबत अर्हता खालील प्रमाणे आहे. खेळनिहाय प्रवेश मर्यादा विचारात घेवून प्रवेश देण्यात येणार आहे.
सरळसेवा प्रक्रिया : क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्य स्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू ज्यांचे वय 19 वर्ष आतील आहे अशा खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती सक्षम देऊन प्रवेश निश्चित केला जातो (50 टक्के प्रवेश).
खेळनिहाय कौशल्य चाचणी : क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्य स्तरावर सहभागी खेळाडूंना ज्यांचे वय 19 वर्ष आतील आहे अशा खेळाडूंना संबंधित खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश निश्चित केला जातो (50 टक्के प्रवेश).
अनिवासी प्रवेश प्रक्रिया : अनिवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशाकरीता अधिकृत राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. इतर खेळाडूंची त्यांच्या क्रीडा प्रकारानुसार विविध कौशल्याची चाचणी घेऊन त्याआधारे खेळाडूंना प्रवेश देण्यात येईल. अनिवासी खेळाडू संख्या एका प्रबोधिनीत 25 अशी राहील. विभाग स्तरावर कौशल्य व सरळ प्रवेश चाचणीचे आयोजन दि.26 व 27 जून 2025 या कालावधीत उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, नागपूर विभाग नागपूर यांचेमार्फत करण्यात येणार आहे आणि राज्य स्तरावर सरळ, प्रवेश चाचणी दि.5 व 6 जुलै 2025 व कौशल्य चाचणी दि.7 व 8 जुलै 2025 या कालावधीत होणार आहे.
तरी अधिकाधिक खेळाडूंनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अनिराम मरसकोले यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.