31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home क्रीडा 6 मार्चला दिव्यांग मुलांसाठी कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

6 मार्चला दिव्यांग मुलांसाठी कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

0
45

समग्र शिक्षाचा उपक्रम.
जिल्ह्यातील 208 दिव्यांग विद्यार्थी घेणार सहभाग.
जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या अध्यक्षेखाली आमदार विनोद अग्रवाल करणार उद्घाटन.

गोंदिया,दि.०५— सर्व सामान्य मुलांप्रमाणे दिव्यांग मुलांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांनाही खेळाचे नियम कळावे व योग्य शारीरिक विकास होण्याच्या उद्देशाने समग्र शिक्षा च्या समावेशित शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील विविध प्रकारचे दिव्यांगत्व असलेल्या 208 मुलांसाठी कुडवा येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात दिनांक 06 मार्च रोजी कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल डोंगरे यांनी दिली आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. दीपप्रज्वलन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम. व उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती सुरेश हर्षे करणार आहेत. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सभापती डाॅ.लक्ष्मण भगत, श्रीमती दिपाताई चंद्रिकापुरे, श्रीमती पौर्णिमाताई ढेंगे, श्रीमती रजनीताई कुंभरे तथा गोंदिया पंचायत समितीचे सभापती मुनेश रहांगडाले उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, पंचायत समिती उपसभापती, कुडवा ग्रामपंचायत सरपंच तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
या एक दिवसीय महोत्सवात सकाळच्या सत्रात रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तर मैदानी खेळांमध्ये 100 मीटर धावणे, 100 मीटर अडथळा शर्यत, लांब उडी, उंच उडी v गोळा फेक अश्या स्पर्धा सकाळी 10.30 ते 1.30 वाजता दरम्यान घेण्यात येणार असून दुपारी सर्व सहभागी विद्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 3.00 ते 5.30 पर्यंत विविध सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत.त्यानंतर संध्याकाळी 6.00 वा. प्राविण्य प्राप्त दिव्यांग मुलांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश हर्षे,पंचायत समितीचे सभापती मुनेश रहांगडाले,माजी सभापती श्रीमती पूजाताई सेठ व सरपंच बालकृष्ण पटले यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.या क्रीडा सत्राच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा समन्वयक विलास मलवार,विशेष शिक्षक विजय ठोकणे, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र फरकुंडे,विशेष शिक्षक विकास लिल्हारे,राजभूषण गजभिये,गजानन धावडे,कुं.विनिता यादव अथक परिश्रम घेत आहेत.