शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये कुठल्याही क्रीडा प्रकारात प्रचंड क्षमता आणि आकर्षण दिसून येत असले आणि खेळाची आवड असली तरी नववी नंतर त्यामध्ये खंड पडत असल्याचे जिल्ह्यातील खेळाडू विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत असल्याचे समजते.
जिल्ह्यामध्ये शासकीय व नगरपालिकेचे असे एकूण दहा क्रीडा मैदान आहेत. यामध्ये शालेय विद्यार्थी खेळाडू सह सर्वच वयोगटातील नागरिक विविध खेळ खेळताना अथवा व्यायाम करताना दिसून येतात.आठ तालुक्यातील आठ ठिकाणी शासकीय क्रीडा संकुल आणि गोंदिया शहरात 1 असे नऊ तसेच नगरपालिकेमार्फत एक असे दहा क्रीडा संकुल आहेत.
भारतीय लोकप्रिय क्रीडा प्रकार क्रिकेट हा सर्वत्र खेळला जात असला तरी, त्याच बरोबर कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, कुस्ती हे क्रीडांगणात खेळले जाणारे खेळही दिसून येतात. मात्र, क्रिकेट हा खेळ मैदानात खेळला जात असल्यामुळे आणि त्याला आतापर्यंतची लाभलेली लोकप्रियता अधिक असल्यामुळे तसेच जास्त प्रेक्षक पहात असल्यामुळे तो भारतातला नंबर एकचा खेळ मानला जातो.
कबड्डी, खो-खो, कुस्ती यासारखे भारतीय खेळही लोकप्रिय आहेत, प्रत्येक विद्यार्थी दशेतला खेळाडू हे खेळ खेळतोच हे मात्र निश्चित. गोंदिया जिल्ह्यातही खेळांमध्ये खेळणारे खेळाडू आहेतच आणि त्यांनी जिल्हास्तरीय, विभागीय स्तरीय, राज्यस्तरीय आणि काहींनी तर राष्ट्रीय पातळीवरही नावलौकिक मिळवलेले आहे.
ज्याला इनडोअर खेळ म्हणतात ते टेबल टेनिस, बॅडमिंटन या खेळातही आत्ता खेळाडू मोठ्या प्रमाणात येत आहेत. मागील दहा वर्षापासून खाजगी बॅडमिंटन अकादमी चालवणारे कोच अँथनी यांचे म्हणणे आहे आज बॅडमिंटन या खेळाला खूप मागणी आहे. जागतिक स्तरावर हा खेळ तिसऱ्या क्रमांकावर आहे तर भारतातही राष्ट्रीय पातळीवर चौथ्या, पाचव्या क्रमांकावर हा खेळ खेळला जातो. कोच अँथनी यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या हाताखालून जाणारे खेळाडू हे अति उत्कृष्ट खेळत असताना त्यांची दहावीची अथवा बारावीची परीक्षा येते आणि ट्युशन अथवा अभ्यासामुळे ते खेळांपासून दूर होतात हे फार दुखत आहे.
राष्ट्रीय पातळीवरील काही खेळाडूंनी बॅडमिंटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पटलावर नावलौकिक केले आहे. गोंदिया सारख्या शहरातही क्षमता असलेले खेडाळू आहेत, मात्र काही प्रमाणात सातत्य नसणे, दहावीच्या – बारावीच्या अभ्यासामुळे त्यांचे खेळ सुटणे हे एक मोठे कारण आहे. जर या खेळाडूंनी सातत्य ठेवले तर हे खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावू शकतात एवढी क्षमता इथल्या खेळाडूंमध्ये आणि या खेळांमध्ये आहे असे त्यांनी सांगितले.
भारत सरकारची खेलो इंडिया या योजनेअंतर्गत सातवी – आठवी च्या विद्यार्थ्यांना खेळांमध्ये अधिक आवड निर्माण व्हावी. पुढे राष्ट्रीय पातळीवर या खेडाळूंना मंच मिळावा यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. त्याचे चांगले परिणामही दिसून येत आहेत. भविष्यात ऑलम्पिक, कॉमनवेल्थ, आशियाई गेम सारख्या खेळांमध्ये अधिक पदके भारताला मिळतील अशी अपेक्षा आहे. खेलो इंडिया अंतर्गत जिल्ह्यात एक प्रशिक्षक नेमलेला आहे.यासह मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत राज्यस्तरावरील सहभागी खेळाडूंना प्रशिक्षकासह त्यांच्या आहाराची व्यवस्थाही करण्यात येते. मिशन लक्षवेध अंतर्गतही एक प्रशिक्षक जिल्ह्यात आहे. राज्य शासनाकडून एकूण 49 खेळ प्रकारांना अनुदान दिले जाते.
जिल्ह्यात ॲथिलिटिक या क्रीडा प्रकारात सर्वाधिक खेळाडू आहेत. ज्यांनी जिल्हास्तर, विभाग स्तरावर, राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय पातळीवरही नाव कमावलेले आहे. राजेश राऊत या खेळाडूला आट्यापाट्या या खेळ प्रकारात राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा पुरस्कारही मिळालेला आहे.योग्य प्रशिक्षण, आहार, व्यायाम आणि पालकांचा खंबीर पाठिंबा खेडाळूला मिळाला तर खेडाळूंचे आयुष्य उज्ज्वल आहे, असे प्रशिक्षक अँथनी सांगतात.-जिल्हा माहिती कार्यालय,गोंदिया




