कला, क्रीडेच्या तासिकांमध्ये वाढ, निर्णयाचे स्वागत : वेळापत्रकात बदल

0
23

मुंबई,दि.12 : शाळेतील कला आणि क्रीडा विषयाच्या तासिका ४ वरून २ करण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत कलेला, खेळायला वाव मिळणार नाही. विद्यार्थ्यांची वाढ खुंटेल असे शिक्षकांचे म्हणणे होते. त्यामुळे याला शिक्षकांनी विरोध केला होता. अखेर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खेळायला आणि कलेसाठी अशा मिळून दोन तासिका वाढवून दिल्याने शिक्षकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या नवीन निर्णयानुसार, शाळांच्या केलेल्या वेळापत्रकात आता कलेसाठी ३ आणि क्रीडा विषयासाठी ३ तासिका ठेवण्याचे जाहीर केले आहे.
नवीन निर्णयानुसार, इयत्ता १ली ते १०वीसाठी एका आठवड्यातील अध्ययन कालावधी हा ४५ तासिकांवरून ४८ तासिका करण्यात आला आहे. एका वर्गाचा आठवड्याचा एकूण वेळ पूर्वी २६.४५ मिनिटे इतका होता. आता हा वेळ २७.१० मिनिटे इतका होणार आहे. शुक्रवारी ८ तासिकांऐवजी आता ९ तासिका होणार आहेत. पहिली तासिका ही ३५ मिनिटांची आणि पुढील सर्व तासिका या ३० मिनिटांच्या असणार आहेत. शनिवारी ५ऐवजी ७ तासिका घेण्यात येणार आहेत. शुक्रवार आणि शनिवारच्या तासिका या कला आणि आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयांसाठी देण्यात याव्यात, असेही स्पष्ट केले आहे.
शाळेमध्ये याआधी कला आणि क्रीडा विषयालाही तितकेच महत्त्व दिले जात होते. त्यामुळे प्रत्येकी ४ तासिका होत्या. पण, मध्ये प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयानुसार, या तासिका फक्त २ तासिका ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त वर्गात शिकवावे लागत होते. त्यामुळे आमची मागणी होती की, परत ४ तासिका कराव्यात. पण, आता प्राधिकरणाने ३ केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे.