पुणे,दि.07 – नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्तीचा मानकरी ठरला. त्याने लातूरच्या अटीतटीच्या लढतीत शैलेश शेळकेचा 3-2 ने पराभव केला. सदगीरने शेवटच्या क्षणी बाजी मारत मानाची गदा मिळवली. या विजयानंतर हर्षवर्धन सदगीरने उपविजेता शैलेश शेळकेला खांद्यावर घेऊन खिलाडूवृत्ती दाखवत मैत्रीचं दर्शन घडवले. लातूरचा शैलेश शेळके आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर हे दोघेही काका पवार यांच्या तालमीतील मल्ल आहेत. त्यामुळे वस्ताद काका पवार यांच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा आहे.महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत लातूरचा शैलेश शेळकेने माती विभागात सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडेवर 11-10 अशा अटीतटीच्या गुणसंख्येने विजय मिळवत फायनलमध्ये धडक दिली. तर नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने मॅट विभागात गतवेळचा उपमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेला 5-2 ने पराभूत केले होते.





