आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन भाजीपाला पीक लागवड

0
42

यशोगाथा-

 गोंदिया तालुक्याचे मुख्‍य पीक भात आहे. तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान 1250 ते 1300 मी.मी. आहे. शेतकऱ्यांना भात पिकाव्यतिरिक्त कोणते पीक घ्यावे हा गहन प्रश्न नेहमी भेडसावत राहतो. त्यामुळे शेतकरी सहजासहजी पर्यायी पीक घेण्यास तयार होत नाही.

        श्रीमती पल्लवी वैभव गजभिये रा.डोंगरगाव यांचे पतीचे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निधन झाले. अशा परिस्थितीत सुध्दा न  डगमगता आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या शेती व्यवसायाकडे वळल्या. त्यांनी दृढ निश्चय करुन भाजीपाला पिकामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरविले. कृषि विभागाच्या अधिकारी/कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2021-22 मध्ये उन्हाळी हंगामामध्ये काकडी पिकाची, क्रिश वाणची लागवड केली. तालुका कृषि अधिकारी गोंदिया यांच्याकडून त्यांना एकात्मिक फलोत्पादन अभियान अंतर्गत प्लॉस्टीक मल्चींग व पंतप्रधान कृषि सिंचन योजना सन 2021-22 अंतर्गत ठिबकसंच या घटकांचा 0.60 हेक्टर क्षेत्राकरीता लाभ देण्यात आलेला आहे.

        काकडी पिकाच्या लागवडीसाठी त्यांनी 0.60 हेक्टर क्षेत्राची निवड केली. जमीन तयार करणे, बियाणे, खते, किटकनाशके, बांबू, प्लॉस्टिक मल्चींग, ठिबकसंच व मजूरी या घटकाकरीता 2 लाख 50 हजार रुपये एवढा खर्च आला. काकडी पिकाचे त्यांनी 36 मे.टन उत्पादन घेतले. स्थानिक बाजारपेठेत व कृषि उत्पन्न बाजार समिती नागपूर येथे मालाची विक्री केली. प्रती किलो सरासरी 12 रुपये बाजारभाव मिळाला. त्यानुसार एकूण उत्पन्न 4 लाख 36 हजार रुपये मिळाले. खर्च वजा जाता एका हंगामामध्ये निव्वळ नफा रक्कम 1 लाख 86 हजार रुपये  झाला. काकडी पिकाचा कालावधी साधारणत: तीन महिन्याचा असून वर्षातून तीन वेळा भाजीपाला पीक घेत असतात.

        आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन भाजीपाला पिकाची लागवड केल्यामुळे कठीण परिस्थितीत आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चांगल्याप्रकारे करत आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक उन्नती साधल्या गेली व कौटूंबिक स्तर उंचावला आहे. इतर शेतकरी बांधवांनी सुध्दा पीक पध्दतीमध्ये बदल करुन भात पिकासोबत भाजीपाला लागवडीकडे वळावे व आपली आर्थिक उन्नती साधावी.