निवृत्तीनंतरही जलप्रेमात रमलेले अभियंता;’लाडेगाव जलताराचे रोल मॉडेल’

0
38
विजय सवाई यांची जलताऱ्यांतून हरित भविष्याची पायाभरणी
वाशिम,दि.१६ मे –लाडेगाव नाव गेल्या काही महिन्यांत जलसंधारणाच्या दृष्टिकोनातून अनेकदा चर्चेत आले आहे. मात्र यावेळी या गावाच्या प्रसिद्धीमागे आहे एक निवृत्त अभियंता आणि त्यांचे निसर्गप्रेम. विजय मोतीरामजी सवाई, हे जलसंपदा विभागामध्ये अकोला येथे उपविभागीय अभियंता या पदावरून सेवा निवृत्त झालेले आहेत. त्यांनी आपले अख्खे आयुष्य जलव्यवस्थापनासारख्या महत्त्वाच्या विषयासाठी खर्ची घातले आणि निवृत्तीनंतरही तेच कार्य पुढे नेण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे.
आज विजय सवाई आपल्या लाडेगाव येथील १५ एकर शेतजमिनीवर स्वखर्चातून २० ते २२ जलतारे तयार करत आहेत. हे कार्य केवळ भौतिक नव्हे तर वैचारिकदृष्ट्याही मोठे आहे. कारण, या जलताऱ्यांमुळे भूगर्भातील जलपातळी वाढेल, शेतीला शाश्वत पाणीपुरवठा मिळेल आणि पावसाच्या पाण्याचा अकार्यक्षम अपव्यय टळेल.
जलसंपदा विभागात दीर्घ अनुभव घेतलेले सवाई यांना पाण्याचे महत्त्व केवळ कागदावरच नव्हे तर प्रत्यक्ष जमिनीवर किती आहे, हे ठाऊक आहे. त्यामुळेच त्यांनी निवृत्तीनंतरही समाजासाठी काहीतरी योगदान देण्याचा निर्धार केला आणि जलतारे उभारण्याचा उपक्रम सुरू केला. हे जलतारे केवळ त्यांच्या शेतासाठी उपयुक्त ठरणार नाहीत, तर आजूबाजूच्या परिसरालाही लाभदायक ठरणार आहेत.
या कामासाठी त्यांनी कोणतीही शासकीय मदत घेतलेली नाही. स्वतःच्या आर्थिक स्रोतांमधून हे सर्व काम सुरू असून, यातून त्यांनी एक संदेश दिला आहे – पाणी हे संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान आहे, आणि त्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतलाच पाहिजे.
आज देशात जलटंचाई, अवकाळी पाऊस आणि हवामान बदल यामुळे शेती संकटात सापडली आहे. अशा वेळी सवाई यांसारखे व्यक्तिमत्त्व आपला अनुभव, ज्ञान आणि निसर्गप्रेम यांचा संगम करून उदाहरण घालून देत आहेत.
विजय सवाई यांची ही जलतारांची वाटचाल म्हणजे पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि शाश्वत शेती या तिन्ही विषयांना समर्पित अशी आधुनिक ‘जलक्रांती’ आहे.