महिला व बालकांच्या पोषणासाठी घरोघरी ‘डिजिटली’ पोहोचणार – मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

0
82

मुंबई दि.23: कोरोना काळात स्तनदा माता, लहान बालके अशा 74 लाख लाभार्थ्यांना पोषण आहार पोहोचवण्याचे शिवधनुष्य विभागाने पेलले. आता ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ डिजिटल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घराघरात जाऊन स्तनदा माता, बालकांचे पालक यांच्याशी संवाद साधत महाराष्ट्र सुपोषित केला जाईल, असा विश्वास महिला व बालविकास ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ या आय.व्ही.आर. (इंटरॲक्टिव्ह वॅाइस रिस्पॅान्स) प्रणालीवर आधारित ॲानलाईन संवाद व्यासपीठाचे आज मंत्री ॲड. ठाकूर यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत उद्घाटन झाले. यावेळी सचिव आय. ए. कुंदन, एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो, महिला व बाल विकास आयुक्त ऋषिकेश यशोद यांच्यासह राज्यातील जिल्हा महिला बाल विकास अधिकारी उपस्थित होते.

यावेळी ॲड. ठाकूर म्हणाल्या, कोरोना महामारीमुळे कठीण अशा काळातही विभागाच्या सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्नांमुळेच राष्ट्रीय पोषण माह 2020 मधे राज्याचा देशात पहिला क्रमांक आला. याच उत्साहाने काम करत ‘सक्षम महिला, सुदृढ बालक, सुपोषित महाराष्ट्र’ हे ध्येय साध्य करण्यासाठी ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ हा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करत असून त्याद्वारे पोषणविषयक माहिती चित्रफितींच्या माध्यमातून घरोघरी पोहोचविले जाणार आहेत.

‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ मधे हेल्पलाइन, ब्रॉडकास्ट कॅाल, व्हॉट्सॲप चॅटबोटचा समावेश आहे. 8080809063 या क्रमांकावरुन गरोदर महिला, स्तनदा मातांना व्हिडिओ, ॲाडियो, व्हॅाट्सअप माध्यमातून पोषण, काळजी याची माहिती दिली जाणार आहे. ‘एक घास मायेचा’ ही खास पाककृतींची व्हिडीओ मालिका तयार करण्यात आली असून त्याद्वारे खास माता आणि बालकांसाठी विविध पाककृतींचे प्रात्यक्षिक आदी दाखविण्यात येणार आहे.

‘आजीबाईच्या गुजगोष्टी’ या ॲनिमेटेड मालिकेतून लोकांच्या मानसिक परिवर्तनाबाबत रंजक गोष्टींच्या माध्यमातून संदेश दिले जाणार आहेत. ‘पोषणासाठी वडिलांची भूमिका’ ही मोहीमदेखील व्हिडिओच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे.