धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0
115

वाशिम, दि. ०१ : देशातील कोट्यवधी बंजारा समाज बांधवांचे श्रद्धास्थान, धर्मगुरू, महान तपस्वी डॉ. रामराव महाराज यांच्यावर आज, १ नोव्हेंबर रोजी श्रीक्षेत्र पोहरादेवी (ता. मानोरा) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, वनमंत्री संजय राठोड यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित अनुयायी, भाविकांनी साश्रुनयनांनी डॉ. रामराव महाराजांचे अंतिम दर्शन घेतले.

संत सेवालाल महाराजांचे वंशज असलेल्या तपस्वी डॉ. रामराव महाराज यांचे शुक्रवारी रात्री मुंबई येथे देहावसान झाले. त्यांनी केलेल्या समाज प्रबोधनाच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. तपस्वी डॉ. रामराव महाराज यांचे पार्थिव काल, ३१ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा पोहरादेवी येथे आणण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह भाविकांनी अंत्यदर्शन घेतले.

आज अंत्यसंस्कारापूर्वी तपस्वी डॉ. रामराव महाराज यांचे पार्थिव जगदंबा देवी मंदिर व संत सेवालाल महाराज मंदिरात नेण्यात आले. त्यानंतर अंत्ययात्रा मठाच्या परिसरात तयार करण्यात आलेल्या अंत्यविधीस्थळी आली. यावेळी उपस्थित अनुयायी, भक्तांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. पोलीस दलाच्यावतीने बंदुकीच्या २१ फैरी झाडून सलामी देण्यात आली. मंत्रोच्चारानंतर परिवारातील सदस्यांनी डॉ. रामराव महाराज यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, खासदार भावना गवळी, खासदार उमेश जाधव, आमदार निलय नाईक, आमदार राजेश राठोड, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार इंद्रनील नाईक, आमदार तथा माजी मंत्री मदन येरावार, आमदार तुषार राठोड, आमदार प्रभू चव्हाण, वाशिमचे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, वाशिमचे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार हरिभाऊ राठोड, माजी मंत्री संजय देशमुख, मखराम पवार, माजी आमदार अनंतकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

पूर्वनियोजनानुसार सोमवारी डॉ. रामराव महाराज यांच्यावर अंत्यसंस्कार होणार होते. मात्र, यादिवशी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सदर अंत्यविधी रविवारी करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाने केली. वनमंत्री श्री. राठोड यांनीही शनिवारी या अनुषंगाने चर्चा केल्यानंतर डॉ. रामराव महाराजांच्या कुटुंबीयांनी रविवारी अंत्यविधी करण्याची जिल्हा प्रशासनाची विनंती मान्य केली.

*मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन*
तपस्वी डॉ. रामराव महाराज यांचे पार्थिव शनिवारी रात्री उशिरा पोहरादेवी येथे आणण्यात आले. याठिकाणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महिला व बाल विकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर, आमदार अॅड. वजाहत मिर्झा, माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली वाहिली.

*जिल्हा प्रशासनाच्या वतीने चोख तयारी*
तपस्वी डॉ. रामराव महाराज यांच्या अंत्यसंस्काराला देशभरातून भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती. अंत्यविधीस्थळी होणारी गर्दी टाळण्यासाठी पोहरादेवी येथे जागोजागी बरेकेट्स लावून त्याच ठिकाणी भक्तांना मोठ्या एलईडी स्क्रीनद्वारे अंत्यविधी पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. शासकीय इतमामात होणारा अंत्यविधी शांततेत पार पडावा, यासाठी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., पोलीस अधीक्षक वसंत परदेशी कालपासूनच आपल्या टीमसह पोहरादेवी येथे उपस्थित होते. देशभरातील भाविकांना डॉ. रामराव महाराज यांचा अंत्यविधी ऑनलाईन पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती.
*****