सर्वोच्च न्यायालय-स्टार प्रचारकाच्या यादीतून नाव हटवण्याचे अधिकार निवडणुक आयोगाला नाहीत

0
104

नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : काँग्रेसच्या स्टार प्रचारकाच्या यादीतून माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे नाव वगळण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. कोणतेही नाव स्टार प्रचारक यादीतून हटवणे निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याचे यावेळी सरन्यायाधीश (CJI) एस ए बोबडे यांनी स्पष्ट केले.या दरम्यान, प्रचार संपुष्टात आला असून कमलनाथ यांची याचिका निष्प्रभावी झाल्याचे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयासमोर म्हटले. यावर, ‘आम्ही हे प्रकरण व्यापक पद्धतीने पाहू… हे तुमच्या अधिकारक्षेत्रात येत नाही’ असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला उत्तर देण्यासाठी नोटीस पाठवली. ‘स्टार प्रचारक यादीतून उमेदवाराचे नाव हटवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला कुणी दिला? तुम्ही निवडणुक आयोग  आहात की एखाद्या पक्षाचे नेता?’ असे प्रश्न उपस्थित करतानाच निवडणूक आयोग एखाद्या स्टार प्रचारकाचे नाव यादीतून हटवू शकते किंवा नाही? याबद्दल सर्वोच्च न्यायालय पडताळणी करणार असल्याचेही सीजेआय बोबडे यांनी म्हटले आहे.

कमलनाथ यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश एस ए बोबडे, न्यायमूर्ती ए एस बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही रामासुब्रमण्यम यांचे खंडपीठ सुनावणी करत आहे. निवडणूक आयोगाने आपल्या मूलभूत अधिकारांचे हनन केल्याचा आरोप कमलनाथ यांनी या याचिकेद्वारे केला आहे.