विधानमंडळ अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा

कोविडच्या पार्श्वभूमीवर आरटीपीसीआर चाचणीनंतरच प्रवेश

0
101

नागपूर, दि. 6 : विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन आयोजनाबाबत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. अधिवेशनासाठी कोविडच्या पार्श्वभूमीवर विविध यंत्रणांनी आवश्यक तयारी पूर्ण करावी, अशा सूचना महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी आज दिल्या.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासंदर्भात करावयाच्या व्यवस्थेबाबतच्या पूर्वतयारीचा आढावा विधानभवन सभागृहात सचिव राजेंद्र भागवत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

यावेळी विधानमंडळाचे उपसचिव विलास आठवले, अध्यक्षांचे विशेष कार्य अधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, सभापतीचे सचिव महेंद्र काज, अवर सचिव रविंद्र जगदाळे, मुख्य सुरक्षा अधिकारी महेश चिमटे उपस्थित होते. तसेच स्थानिक व्यवस्थेसंदर्भात जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती शितल उगले तेली, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण बी., मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महसूल विभागाचे उपायुक्त आशा पठाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त बसवराज तेली, सारंग आवाड, विनीता साहू, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच आरोग्य, विद्युत, रेल्वे आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशनासंदर्भात करावयाच्या व्यवस्थेबाबतचा आढावा विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी घेतला. अधिवेशना संदर्भातील निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशनासाठी दरवर्षी प्रमाणेच आवश्यक व्यवस्था राहणार असली तरी कोविडच्या पार्श्वभूमीवर या व्यवस्थेमध्ये आवश्यक बदल करण्यात येणार आहे. मुंबई येथे झालेल्या अधिवेशनाप्रमाणे विधानभवन परीसरात आरटीपीसीआर या कोविडच्या चाचणीनंतरच प्रवेश असल्यामुळे आरोग्य विभागातर्फे आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करावे तसेच चाचणीचा अहवाल नियोजित वेळेत उपलब्ध करुन देण्यात आल्यानंतरच प्रवेश देण्यात येणार आहे. या चाचण्या मोठ्याप्रमाणात अपेक्षित असल्यामुळे त्यानुसार नियोजन करावे, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

विधानभवन, आमदार निवास, सुयोग, तसेच निवास व्यवस्था असलेल्या सर्व इमारती निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही सुरु करावी, विधानभवनातील प्रत्येक दालनाच्या बाहेर सॅनिटायझर मशीन बसविण्यात यावी, अशी सूचना करताना सचिव श्री. भागवत म्हणाले की, विधीमंडळाच्या सदस्यांना मास्क, सॅनिटायझर असलेली कीट दररोज उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नियोजन करावे. आमदार निवास येथे कोविड सेंटर असल्यामुळे येथील संपूर्ण निवास व्यवस्थेसंदर्भातील खबरदारी घेवून संपूर्ण इमारत निर्जंतुकीकरण होईल याबाबत खबरदारी घेण्याबाबतही बैठकीत सूचना करण्यात आली.

विधानमंडळाच्या अधिवेशनासाठी केवळ सन्मानीय सदस्य तसेच आवश्यक असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रवेश राहणार आहे. प्रवेशापूर्वी आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल सोबत असणे आवश्यक आहे. या चाचण्या करण्यासाठी आमदार निवास, कर्मचारी निवासस्थान, रविभवन आदी सात ठिकाणी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली.

पोलीस विभागातर्फे विधानभवन, आमदार निवास येथील सुरक्षेसंदर्भात सिक्युरिटी ऑडीट करण्यात आले आहे. कोविड-19 च्या संदर्भात केंद्र व राज्य शासनाने जारी केलेल्या सूचनेनुसारच संपूर्ण अधिवेशन कालावधीत नियोजन राहणार आहे. त्यामुळे गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. नागपूर महानगरपालिकेतर्फे परीसराची संपूर्ण स्वच्छता, पिण्याचे पाणी आदी व्यवस्था करण्यात येणार आहे. अधिवेशन कालावधीत विद्युत व्यवस्थेत खंड पडणार नाही याबाबतही आवश्यक सुधारणा पूर्ण झाल्या आहेत. हिवाळी अधिवेशनासाठी राज्याच्या विविध भागातून व्यवस्थेसाठी येणारे अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा व्यवस्थेसाठीच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कोविड संदर्भातील आरटीपीसीआर टेस्ट करुनच सेवा घ्यावयात, अशा सूचना करण्यात आल्या.

नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी जिल्हा प्रशासनातर्फे करावयाच्या वाहन व्यवस्थेसंदर्भात नियोजन करण्यात आले आहे. तसेच आवश्यक साहित्य व सामुग्री विधीमंडळाच्या मागणीनुसार उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी यावेळी दिली.

हिवाळी अधिवेशनाच्या व्यवस्थेबाबतचा आढावा अवर सचिव रविंद्र जगदाळे यांनी बैठकीत सादर केला. यामध्ये सुरक्षा व्यवस्था, निवास व्यवस्था, दालन व्यवस्था, सर्वसाधारण व्यवस्था, दूरध्वनी, उपहारगृह, विद्युत पुरवठा, अधिवेशन कालावधीत विधानभवन परीसरात वार्ताहारांसाठी करावयाची व्यवस्था तसेच 160 खोल्यांचे गाळे येथील व्यवस्थेचा समावेश आहे.