राज्यातील भाजपा सरकार पाच वर्षे समर्थपणे काम करेल – राजीवप्रताप रूडी

0
19
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई -भारतीय जनता पार्टीचे राज्यातील सरकार स्थिर असून समर्थपणे पाच वर्षे काम करेल, असा विश्वास पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व केंद्रीय मंत्री राजीवप्रताप रूडी यांनी गुरुवारी मुंबईत व्यक्त केला.
भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सरचिटणीस आमदार संभाजी पाटील व रणजीत पाटील, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी. व प्रवक्ते अवधूत वाघ उपस्थित होते.
मा. राजीवप्रताप रूडी यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणत्याही व्यक्तीने अथवा पक्षाने भाजपा सरकारला पाठिंबा दिला तर आम्ही तो घेऊ. पण त्याचा अर्थ ती व्यक्ती किंवा पक्ष सरकारमध्ये सहभागी होईल, असा होत नाही. कोणी आम्हाला पाठिंबा देत असेल आणि आम्ही स्वतःहून नाही म्हणावे, असे होत नाही.
ते म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुकीचा जनादेश भाजपाने सरकार चालवावे असा आहे. त्यानुसार राज्यात भाजपाचे सरकार चांगल्या रितीने चालू आहे. हे सरकार पाच वर्षे समर्थपणे टिकेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या कामांसाठी पुढाकारही घेतला आहे.
शिवसेनेने सोबत यावे अशी आमची इच्छा आहे. त्या पक्षासोबत प्रदेश पातळीवर चर्चा सुरू आहे. त्याचे चांगले फलित दिसेल. थोडा विलंब होत असला तरी यामध्ये मार्ग निघेल, असे त्यांनी सांगितले.
राज्यातील अनेक गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती असून त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकार जे काही पावले टाकेल, त्याला केंद्र सरकार साथ देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याकडे कौशल्य विकासाची जबाबदारी सोपविली आहे. देशामध्ये २०२० पर्यंत पन्नास कोटी व्यक्तींना प्रशिक्षण देऊन रोजगारासाठी सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे. ही जगातील सर्वांत मोठी योजना आहे. महाराष्ट्र हे औद्योगिक व आर्थिकदृष्ट्या विकसित केंद्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य विकास योजनेचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला मिळवून देण्यात आपण महत्त्वाची भूमिका पार पाडू.